Wednesday, April 29, 2020

फोटोफ्रेम

शरदराव आज जरा जास्तच खुशीत घरी परतले. बऱ्याच दिवसांपासून मनात भरलेली एक फोटोफ्रेम जुन्या बाजारातून त्यांनी मिळवली होती. शरदरावांना जुन्या वस्तु जमविण्याचा छंद होता. अशा अनेक वस्तू त्यांनी जमा केल्या होत्या. त्यासाठी ते ऑफिस मधून घरी परततांना मुद्दाम जुन्या बाजारात दोन-चार दिवसात एक तरी चक्कर टाकत. अशाच वेळी त्यांना ती धातुची नक्षीदार फ्रेम आढळली. जरी तिच्यावर मळ, घाण साचलेली होती तरी स्वच्छ झल्यावर सुंदर दिसेल हे त्यांनी हेरले होते. थोड़ी घासाघीस करून शेवटी ती फ्रेम त्यांनी स्वस्तात मिळवलीच.

शबनम मधून फ्रेम टेबलावर काढून ठेवत ते न्हाणीघरात शिरले, कपड़े बदलून, हात पाय धुवून ते स्वयंपाकाच्या तयारीला लागले. शरदराव त्यांची पत्नी देवघरी गेल्यापासून एकटेच त्या फ्लॅट मध्ये रहात असत. त्यांच्या मुलीचे म्हणजे शुभाचे लग्न दीड वर्षापूर्वीच झाले होते, आणि त्या नंतर काहीच दिवसांनी त्यांच्या पत्नीचे निधन झाले. ते आता तेथे राहणारे एकटेच उरले होते.

स्वयंपाक उरकून जेवण आटोपून त्यांनी आज खरेदी केलेली फ्रेम हातात घेऊन निरीक्षण करायला सुरवात केली. विदेशी बनावटीची ती फ्रेम निदान 70-80 वर्षापूर्वीची तरी असावी किंवा त्याहून ही जुनी असावी असा अंदाज त्यांनी बांधला. फ्रेम मधला सडका पुट्ठा काढून त्यांनी वेगळा केला, फुटकी काचही बाहेर काढून कचरा पेटीत टाकली. त्या धातुच्या फ्रेमला पीताम्बरीने घासुन तिच्यावरचा मळ आणि बुरसटलेली घाण स्वच्छ केली. फ्रेमची रंगत आता काही औरच दिसु लागली. अगदी नव्या फ्रेम सारखी, चकचकीत.

दुसऱ्या दिवशी ऑफिसची सुटीच होती. तिचा फायदा घेत बाजारात जाऊन एक फोटोफ्रेमवाल्या कडून त्यांनी फ्रेमची काच आणि मागला पुट्ठा बसवून घेतला.
घरी येवून त्यात कोणाचा फोटो टाकावा याचा विचार करु लागले. तितक्यात त्यांना शेजारील फ्लॅट मधल्या प्रणिताचा फोटो ड्रावरमधे ठेवलेला आठवला. अगदी बरोबर फिट होत होता फ्रेम मधे. प्रणिता...पाचवीत शिकणारी हुशार, गोड व चुणचुणित, शरदरावांची अगदी लाडकी होती, शेजारचे रानडे यांची मुलगी. फावल्या वेळेत शाळा सुटल्यावर ती शरदकाकांकडे येऊन बसत असे. गप्पा आणि खाऊची मजा बऱ्याच वेळ चालत असे. 

प्राणिताचा फोटो फिट करून शरदरावांनी फ्रेम आपल्या पलंगाशेजारच्या टेबलावर मांडून ठेवली व रात्री नेहमीच्या ठराविक वेळी झोपी गेले. उशीरा रात्री त्यांना एकाएक गलबलाट ऐकू आला व झोप चाळवली गेली. रस्त्यावर लोकांची काही गडबड चालली असेल असा विचार करून त्यांनी कूस बदलली आणि त्यांचे लक्ष त्या नव्याने आणलेल्या फ्रेमकडे गेले. अंधारात एखाद्या टीव्हीत चालावे असे दृश्य त्यात दिसत होते. एका सभागृहात घोषणा होत होती... "आजच्या भाषण प्रतियोगितेची पहिल्या क्रमांकाची विजेती आहे..प्रणिता रानडे" आणि त्यानंतर टाळ्यांच्या गजरात प्रणिता ने बक्षीस घेतले आणि फोटो फ्रेम मधले ते दृश्य दिसायचे बन्द झाले आणि अंधार झाला. 

ते पाहून शरदराव आश्चर्य चकित झाले, बराच वेळ त्यांना काही सुचेनासे झाले. फ्रेममधले ते आश्चर्यजनक दृश्य सारखे त्यांच्या डोळ्या पुढे तरळत राहिले. भास होता, स्वप्न होते कि खरेच तसे काही घडले याचा विचार करत करत नंतर केव्हां तरी बऱ्याच उशीरा त्यांना झोप लागली. सकाळी दारावर पडणाऱ्या थापेच्या आवाजाने त्यांना जाग आली. दार उघडून पाहिले तर शाळेच्या गणवेशात प्रणिता दारासमोर उभी होती. तिने लगेच पाया पड़त शरदरावांना म्हटले,  "काका आशीर्वाद द्या, आज शाळेत भाषण स्पर्धा आहे, मी ही भाग घेतलाय."
शरदरावांना लख्खकन काल रात्रीचा प्रसंग आठवला. ते म्हणाले, "बेटा पहिला नम्बर मिळवणार आहेस बरं कां. संध्याकाळी येतोय मिठाई खायला."
"काय काका... माझी तयारी ही झाली नाहीये व्यवस्थित"
"काही काळजी करु नको ग, नम्बर तुझाच येणार"
रात्री पाहिलेल्या स्वप्नाच्या त्या दृष्याच्या बळावर शरदराव बोलून गेले.

प्रणिता शाळेत निघुन गेली आणि इकडे शरदराव नेहमीच्या दिनचर्ये प्रमाणे त्यांच्या वेळेवर ऑफिसला निघुन गेले. संध्याकाळी घरी परत येताच दार उघडायच्या आधीच प्रणिता हजर होती. 
"काका, चला माझ्या घरी. तुम्हाला आनंदाची बातमी सांगायची आहे."
शरदराव रानडे यांच्या घरात शिरले. प्रणिता मिठाईची बशी पुढे करत म्हणाली
"काका, तुम्ही म्हटल्या प्रमाणेच झाले, भाषण स्पर्धेत माझा पहिला क्रमांक आला, हे बघा माझे बक्षीस."
शरदराव चकित झाले, रात्रीच्या दृष्यात पाहिलेले बक्षीस हुबेहुब असेच होते, म्हणजे हा एक योगायोग होता की काय? कि प्रीइन्ट्यूशन म्हणतात तसला प्रकार??

शरदरावांचे डोके थोड़े गरगरु लागले, पण स्वतःला साम्भाळत नाश्ता-चहा आटोपून ते घरात आले. आता त्यांना फ्रेमची पुनर्परीक्षा घ्यायची होती. रात्री झोपायच्या आधी त्यांनी फ्रेम मधला फोटो बदलून दुसरा फोटो लावायचे ठरविले व एका वरिष्ठ सिनेनटाचा फोटो मासिकातून कापला आणि फ्रेम मधे फिट केला. आज रात्री काय होते याची उत्सुकता त्यांना लागली होती. 

रात्री उशीरा तोच प्रकार घडला, फ्रेममधे चलचित्रांची मालिका सुरु झाली. त्या प्रसिद्ध नटावर एका नटी ने शूटिंगच्या वेळी गैरवर्तन केल्याचा आरोप केला गेला होता आणि तो नट समाचार वाहिनीच्या पत्रकारांसमोर स्वतःला निर्दोष म्हणून आपली कैफियत मांडण्याचा प्रयत्न करता होता. एक दीड मिनिटात एवढे दृश्य चालल्यावर ते दृश्य विरुन गेले.

शरदरावही त्या सज्जन स्वभावाच्या नटाच्या वर्तनावर केल्या गेलेल्या आरोपावर आश्चर्य करत झोपी गेले.
पुढील तीन चार दिवस उत्सुकतेने टीव्हीवर त्या बातमीची वाट पहात राहिले, पण तशी बातमी इतक्या दिवसात काही त्यांना बघायला मिळाली नाही. त्यामुळे प्रणिताच्या बक्षीसाची गोष्ट योगायोग समजून सोडून दिली. एव्हाना तो फोटो फ्रेम मधे तसाच लागलेला राहून गेला.

पुढच्या रविवारी दुपारी शरदराव चहा घेत टीवी समोर बसले होते. तितक्यात एक बातमी झळकली. त्यात तोच नट स्वतःविषयी सफाई देत होता. जे दृश्य शरदरावांनी त्या रात्री पाहिले होते ते जसेच्या तसे समोर परत घडत होते. आता मात्र शरदराव हबकले. म्हणजे ती "फोटोफ्रेम , जिचा फोटो लावलेला असेल तिच्या भविष्यतील घटनेची चाहूल देत असते हे खरेच !"

आता मात्र हे सारे योगायोग नसून फोटोफ्रेमचीच किमया आहे हे ते समजून चुकले, पण बराच विचार करून याचा उल्लेख कोणासमोरही करायचा नाही हेही मनोमन पक्के ठरवले. कारण कोणीही त्यावर सहजासहजी विश्वास ठेवला नसता किंवा तिचा गैरवापर होण्याचीही शक्यता होती. तरीही पुन्हा एकदा फ्रेमच्या चमत्काराची खात्री करण्यासाठी त्यांनी सध्या फारश्या प्रसिध्द नसलेल्या एका क्रिकेट खेळाडुचा फोटो शोधून फ्रेममध्ये बसवला. पूर्वीसारखाच प्रकार त्या रात्री पुन्हा घडला. त्या खेळाडूने क्रिकेटच्या सामन्यात शंभर धावांची खेळी पूर्ण केली म्हणून मैदानात जल्लोष होत असलेला फ्रेम मधे शरदरावांनी पाहिला.

काही दिवसांनी दोन देशांमध्ये चालत असलेल्या क्रिकेटच्या वन डे सीरीज मध्ये पदार्पण सामन्यातच एका नवीन खेळाडूने शतक झळकवायची कामगिरी दाखविल्याचे फोटो वर्तमान पत्रात सविस्तर बातमीसकट प्रकाशित झाले. त्यात छापला गेलेला खेळाडूचा फोटो काही दिवसांपूर्वी रात्री पाहिलेल्या दृष्यातलाच भाग होता. आता मात्र शरदरावांना पूर्णच खात्री झाली कि ती फोटोफ्रेम चमत्कारी असून ती भविष्यातील एखाद्या घटनेचा संकेत करते.

शरदरावांनी त्यानंतर अनेक वेळा फोटो बदलून फ्रेमच्या चमत्कृतिचा पडताळा घेतला. निरनिराळ्या फोटोंना बसवून फ्रेमची परीक्षा घेतली. पण स्वतःचा फोटो लावून पाहण्याची हिम्मत झाली नाही, न जाणो काय अनपेक्षित समोर येऊन उभे ठाकेल ते. 

इतक्यात प्रणिताची वार्षिक परीक्षा जवळ आली होती. प्राणिताबद्दल काही समजेल या दृष्टीने शरदरावांनी तिचा फोटो पुन्हा फ्रेममध्ये बसवला. त्या रात्री उत्सुकतेने वाट बघत राहिले. शेवटी तो क्षण आला आणि ती फ्रेम उजळली. प्रणिता दोन विषयात सोडून सर्व विषयात नापास झालेले प्रगति पुस्तक त्यात दिसले. शरदरावांना या वेळी फ्रेमकडून काही चूक झाल्याची खात्री पटली, कारण प्रणितासारखी हुशार मुलगी जिचा नेहमी पहिल्या पाचात नम्बर असे ती नापास होणे शक्यच नव्हते.

करत करत प्रणिताची परीक्षा डोक्यावर येऊन ठेपली.  मराठी भाषेचा पहिला पेपर तिने उत्तमरित्या सोडवला होता. पुढचा पेपर सायन्सचा होता, तो ही पेपर प्रणिताने छान सोडवला होता. प्रणिता चे पेपर चांगले जात असल्याचे पाहून शरदरावांना समाधान वाटत होते. तिसरा पेपर इतिहास भूगोलाचा होता. नेहमीप्रमाने आजही परिक्षेला जातांना ती शरदरावांच्या पाया पडून गेली. संध्याकाळी शरदराव ऑफिसातून आल्यावर प्राणिताकडे पेपरची चौकशी करायला गेले. तर प्रणिता तापाने फणफणत पडून असल्याचे समजले. पेपर लिहिता लिहिताच तिला अचानक ताप चढून आल्याचे समजले. पेपर तसाच अर्धवट टाकून ती घरी परतली होती. शरदरावांच्या मनात शंकेची पाल चुकचुकली. त्यांना तिच्या पुढच्या पेपर्सची काळजी वाटू लागली. तसेच घडले. प्रणिताला टायफाइडमुळे पुढचा एकही पेपर देता आला नाही.

शरदरावांना त्या फ्रेमचा रागच आला, जणु काही ही त्या फ्रेमचीच चूक होती. फ्रेममधला फोटो काढून ती रिकामी फ्रेम त्यांनी कपाटात ठेवून दिली. बरेच दिवस झाले, ती फ्रेमची आठवण त्यांच्या मनात पुसट होत गेली.

खूप दिवसांनी आज शरदराव जाम खुश होते. त्यांची मुलगी शुभा उद्या म्हणजे रविवारी आठवडाभरासाठी रहायला येणार होती. तशी ती महिना दोन महिन्यात भेटून जात असे, पण फारच थोड्या वेळासाठी. यावेळी ती जास्त दिवस मुक्काम करणार होती, म्हणून शरदरावांनी भरपूर भाज्या, फळे, स्वीट्स वगैरे आणून फ्रिज भरून टाकला होता. 

रविवार उजाडला, शरदराव बालकनीत बसून बराच वेळेपासून शुभाची वाट पहात होते. खाली रस्त्यावर एक रिक्शा येऊन उभी राहिली. त्यामधून शुभाला उतरतांना त्यांनी बघितले. शरदराव लगेच खाली उतरले, तेवढ्यात शुभाने आपली कपड्यांची एयरबॅग उतरून घेतली होती. 

"काय गं, एकटीच आलीस? जावईबापू नाही आले? मला वाटलं होतं, ते येतील तुला सोडायला."
"नाही, ते कंपनीच्या कामाने टूरवर गेलेत दहा बारा दिवसांसाठी, म्हणून तर मला वेळ मिळाला इतक्या दिवसांसाठी इकडे यायला." 
"चला वर जाऊया" म्हणत शरदरावांनी बॅग उचलली आणि वर निघाले. 

घरात येऊन बॅग जागेवर ठेवली आणि स्वतः चहा करायला घेतला. चहा झाल्यावर काही वेळ हालहवाल विचारपूस करून शरदराव म्हणाले "आलो मी इतक्यात, "आस्वाद"मधून  लंचपॅक घेऊन येतो, आल्या आल्या तू स्वयंपाकाला नको लागू"

दुपारचे जेवण आटोपून आराम झाला. संध्याकाळचा चहा घेत शुभा म्हणाली, "बाबा, घर थोड़े आवरून घ्यायला पाहिजे, खूप दिवस झालेत, कानेकोपरे स्वच्छ झाले नाहियेत. उद्या तुम्ही ऑफिसला गेल्यावर करते मी."
"बरं, तुला वाटेल तसं कर, मला याकरता घरात फार वेळ देता येत नाही नि तेवढी मेहनतही होत नाही."

पुढल्या दिवशी शरदराव ऑफिसला गेले आणि शुभाने दुपारी घर आवरायला घेतले. स्वयंपाकघर, बैठकीची खोली आवरून झाल्यावर तिने बेडरूमकडे मोर्चा वळवला. टेबल, खुर्ची, बेड व्यवस्थित केले आणि कपाट आवरायला घेतले. पुस्तकं व इतर साहित्य पुसून झटकून पुन्हा नीट रचून ठेवतानांच ती रिकामी फोटोफ्रेम तिच्या हाताला लागली. इतकी सुंदर फ्रेम पाहून ती हरखुन गेली. तिला छान पुसून काढले. इतकी सुंदर फ्रेम रिकामी कशी ठेवलेली म्हणून तिने स्वतःचाच लहानपणाचा एक फोटो अल्बम मधून काढून त्यात बसवला आणि ती फ्रेम टेबलावर ठेऊन दिली.

संध्याकाळी शरदराव ऑफिसतून लवकरच परतले. चहा-नाश्ता घेऊन बराच वेळ शुभाबरोबर गप्पा मारत बसले. नंतर शुभाने रात्रीचा स्वयंपाक तयार केला. दोघांनी जेवण केले. शरदराव आपल्या खोलीत झोपायला गेले. मात्र टेबलावरील फोटो घातलेल्या फ्रेमकडे त्यांचे लक्ष गेले नाही. रात्री उशीरा कोणाच्या तरी हम्बरडा फोडून रडण्याच्या आवाजाने त्यांची झोप मोडली. आवाज ओळखीचा वाटत होता. आवाजाच्या दिशेने त्यांनी पाहिले तेव्हा टेबलावरील फ्रेमकडे त्यांचे लक्ष गेले. त्यात शुभा जोरजोराने रडत असतांना दिसत होती. दहा वीस सेकंदाने चित्र दिसेनासे झाले. शरदराव शहारून उठले. फ्रेमबद्दल एक भयमिश्रित चीड त्यांना आली. त्याच क्षणी तिचा निकाल लवकरात लवकर लावायचा त्यांनी विचार केला. पण इतक्यात पाहिलेल्या दृष्याने उत्पन्न बेचैनी मुळे रात्रभर ते झोपू शकले नाहीत. पहाटे उशीरा केव्हां तरी त्यांचा डोळा लागला.

सकाळी उठताच तोंड वगैरे धुवून, चहा घेताच एक निर्धार करून ते उठले. टेबलावरची फ्रेम उचलून शबनम मधे ठेवली आणि शुभाला "आलोच अर्ध्या तासात" म्हणून घराबाहेर पडले. चालत चालत ते नदीवरच्या पुलाच्या मध्यावर येऊन उभे राहिले. खांद्यावरची शबनम उतरून त्यातली फ्रेम बाहेर काढली आणि हात उगारून जोराने नदीच्या पात्रात फेकायला गेले आणि तेव्हाच तोल जाऊन रस्त्यावर उताणे पडले.... पण... पण तितक्यात एक ट्रक धडधडत मागून आला आणि त्यांना चिरडून पुढे निघून गेला.

- विवेक भावसार

Wednesday, April 22, 2020

कविता कशावरही सुचू शकते

ठिणगी ही मनात केव्हां पडेल 
कोणाच्या हातात ते कधीच नसते
नसते तिला विषयांचे बंधन
अनायास ती कधीही स्फूरते
कविता कशावरही सुचू शकते

झाडांवर, फुलांवर, उमलत्या कळ्यांवर
पानांवर, रानांवर, शेतांवर, मळ्यांवर
चंद्रावर, सूर्यावर, पृथ्वीवर, देशांवर
देशात आढळणाऱ्या भिन्न भिन्न वेशांवर
कविता कशावरही सुचू शकते

रडण्यावर, हसण्यावर, कुंथण्यावर, कण्हण्यावर
कोणाच्या मौनावर, तर कोणाच्या म्हणण्यावर
दुःखावर, रागावर, प्रेमावर, रोषावर
निरागस बाळाच्या गोड गोड हशावर
कविता कशावरही सुचू शकते

जन्मावर, मरणावर, जीवनावर, जगण्यावर
मुलांवर, मोठ्यांवर, वृद्धांवर, तरुणांवर
तरुणांच्या रक्तात सळसळत्या जोशावर
विजयी चौकारानंतरच्या स्फूर्त जल्लोषावर
कविता कशावरही सुचू शकते

पक्ष्यांवर, प्राण्यांवर, किड्यांच्या गाण्यावर
पक्ष्यांच्या दाण्यांवर, चोचभर पाण्यावर
रानात बागडणाऱ्या पांढऱ्या सशावर
पाण्यात पोहणाऱ्या चपळ माशावर
कविता कशावरही सुचू शकते

मित्रांवर, नात्यांवर, सृष्टांवर, दुष्टांवर
जगतांना भोवणाऱ्या अगणित कष्टांवर
आपल्यात गुंतवून टाकणाऱ्या कोषांवर
कोषातील बंधनकारक अगणित पाशांवर
कविता कशावरही सुचू शकते

चेहऱ्यावर, डोळ्यांवर, गालांवर, ओठांवर
सडपातळ बांध्यांवर, सुटलेल्या पोटांवर
हवेत उडत्या शामल केशपाषांवर
सुरकुतलेल्या चेहऱ्याच्या एकेक रेशांवर
कविता कशावरही सुचू शकते

दारावर, पारावार, अंगणावर, मोरीवर
कपडे वाळत घातलेल्या दोरीवर
चुलीत धुमसणाऱ्या ओल्या कोळशांवर
धुरात जळणाऱ्या डोळ्यांच्या रेशांवर
कविता कशावरही सुचू शकते

-विवेक भावसार