Friday, January 3, 2020

मुच्छकटिकम (मराठी)




लांबवर वाळवंटातून एक काळा ठिपका आस्ते आस्ते मोठा होतांना बसरा शहराच्या सीमेवरील पहारेकऱ्यास दिसत होता. थोड्याच वेळात तो ठिपका एका माणसाच्या रुपात देवडीपाशी येऊन उभा ठाकला. घामाघूम झालेला तो इसम थोडा दम घेतल्यावर शिपायाकडे वळला. शिपायाने त्याचे नाव विचारले, तेव्हां तो लांब पांढऱ्या दाढी मिशा असलेला, अंगात पायघोळ मळका झगा व खांद्यावर एक फाटकी पिशवी लटकावलेला प्रवासी उत्तरला- ‘‘लिहा... मुल्ला नसरुद्दीन.
    "चला गावात शिरण्याचा कर म्हणून एक दीनार काढा’’ शिपायाने त्याचे नाव लिहीता लिहीता म्हटले.
   मुल्ला नसरुद्दीनने कडोसरीत चाचपून सांभाळून ठेवलेल्या काहीं नाण्यांपैकी एक दीनारचे नाणे काढून शिपायाच्या हातात ठेवले. शिपायाने मुल्लाला रस्ता खुला करुन दिला आणि नसरुद्दीनने शहरात प्रवेश केला.

   भुकेने व्याकूळ मुल्ला शहरात भटकू लागला. भूक शमविण्याच्या दृष्टिने एखादी खानावळ शोधत शोधत तो शहराच्या मुख्य बाजारापर्यंत येऊन पोहोचला. तेथे एका खानावळीच्या बाहेरपर्यंत खाद्यपदार्थांचा खमंग असा वास सगळीकडे पसरुन राहिलेला होता. आत रेडियोवर येत असलेली सिनेमाची गाणीही ऐकू येत होती. खानावळीत जेवणारांची बरीच गर्दी दिसत होती. कांही लोक आपली पाळी येण्याची वाट पहात बाहेरच तिष्ठत उभे होते. ते सर्व पाहून मुल्लाने ठरविले कि याच खाणावळीत आता जेवण जेवू या.आणि तो देखील आपली पाळी येण्याची वाट बघत इतरांसोबत खानावळीबाहेर उभा राहिला. थोड्याच वेळात त्याची पाळी आली नि नसरुद्दीन खानावळीत दाखल झाला.

  काय खाणार ?, सामिष की निरामिष?  खानावळीच्या मालकाने विचारले.

  नसरुद्दीन म्हणाला, सामिष वाढा

   बकऱ्याचा रस्सा आणू का कोंबडीचा ?’ खानावळीचा मालक.

   मुल्ला म्हणाला ‘‘बकऱ्याचा रस्सा वाढ.’’

  दोनच मिनिटांत नसरुद्दीनपुढे ताटात वाढलेला बकऱ्याच्या मटणाचा रस्सा व काहीं रोट आले. नसरुद्दीन रोटचा तुकडा तोडून रश्यात बुडवणार इतक्यात रश्यात तरंगत असलेला एक केस त्याला दिसला. मुल्लाने चिमटीत धरुन तो केस वाटीतल्या रश्यातून बाहेर काढला आणि खानावळीच्या मालकाला बोलावले. खानावळीचा मालक-कम-आचारी सद्दाम आला नि खेकसला
काय झालं ?, कशाला बोलावलं

  नसरुद्दीनने त्याला तो केस दाखवत विचारलं, "हे काय आहे ?"

  मग्रुरीतच मालक उत्तरला‘‘केस आहे.’’

  नसरुद्दीन म्हणाला"हा केस जेवणात निघाला, यात कसा आला केस ?"    
  मालक मग्रुरी कायम ठेवत म्हणाला‘‘ तुला सामिष जेवण हवे होते ना ?, हा त्या बोकडाच्या मिशीचा केस आहे ज्याचा रस्सा तुला वाढलाय. पटकन् खा आणि पुढच्या गि-हाईकासाठी जागा रिकामी कर’’
  ‘‘बोकडाच्या मिशीचा केस काय ?’’  म्हणत नसरुद्दीनने तो केस पाण्याच्या ग्लासात बुडवून धूवून पुसून काढला, तरी तांबडाच.
  तुझा बोकड मेंदीने केस रंगवतो काय? आणि बोकडाला मिशी असते म्हणे. बोलत बोलत नसरुद्दीनने चिमटीतला केस पडताळून पाहण्यासाठी त्या मालकाच्या मेंदीने लाल केलेल्या मिशीला लावला. हातातला केस मालकाच्या मिशीशी तंतोतंत जुळताच मुल्ला म्हणाला‘‘बोकडाचा नाही, तुझ्या मिशीचा केस आहे हा.’’

   ते ऐकताच खाणावळीचा मालक खवळला, 
‘‘माझ्या खाणावळीत येतो आणि माझ्याच मिशीत हात घालतो ? चल चालता हो. खबरदार येथुन पुढे जवळपास दिसलास तर’’ असे म्हणून त्याने मुल्लाचा हात धरुन नोकरांच्या मदतीने त्याला खानावळीबाहेर खेचत आणले व रस्त्यावर ढकलून दिले. नंतरही बराच वेळ त्याची बडबड चालूच होती. मुल्लाला शिव्या घालत बोलला 

‘‘सद्दामच्या मिशीला हात लावतो काय ? लेकाचा चांगला धडा शिकवायला पाहिजे त्याला. शिपायांना सांगून फटकेच लावायला पाहिजेत याला.’’

   चार लोकांसमोर झालेल्या अपमानामुळे दुःखी नसरुद्दीन रस्त्यावरुन उठत दोन मिनटं त्याची बडबड ऐकून म्हणाला‘‘ फार अभिमान आहे ना सद्दाम तुला या मिशीचा ? तुझीच काय तर या साऱ्या बसरा शहराच्या मिश्या नाही साफ केल्या एक दिवस तर नावाचा मुल्ला नसरुद्दीन नाही, लक्षात ठेव.’’
  इतके बोलून रागाने नसरुद्दीन पुढे चालू लागला.

  दुसरी एक खानावळ शोधून त्याने आपला पोटोबा शांत केला. पोट भरल्यावर तो शहर बघत असाच भटकत राहिला. अंधार होत आला होता. रात्रीची काय व्यवस्था करावी या विवंचनेत तो बाजारापासून लांब अशा एका दुकानावर आला. दुकान बंद झालेले होते. आपल्या पिशवीतून एक चादर काढून मुल्ला नसरुद्दीनने दुकानाच्या ओट्यावर अंथरली आणि अंगाचे मुटकुळे करुन तो झोपी गेला.

  सकाळी त्याला अंग हलवून जागं करत कोणी म्हणत होतं
  ‘‘उठ रे बाबा ! दुकान उघडायची वेळ झालीये, कुठे दुसरीकडे जाऊन पड.’’

   मुल्ला नसरुद्दीन डोळे चोळीत उठला, इतक्या सकाळच्या वेळी कोण दुकान उघडायला आला म्हणून तो थोडा नाराज झाला. पण तरी चादर आवरुन पलीकडच्या नळावर चूळ भरुन व तोंडावर पाणी मारुन परत आला. तोपर्यंत दुकान उघडलेले होते.

   ते एका हजामाचे दुकान होते. दात तुटलेले चारपाच कंगवे, दांडी तुटलेली कातर, वस्तरा, दाराशी लटकावलेला धार लावायचा चामडी पट्टा, ज्यात आपलं तोंड कुठं दिसतयं ते शोधावं लागेल असा पॉलिश निघालेला भिंतीवर बसवलेला जुनाट आरसा, त्याच्या पुढं ठेवलेली एक मोडकी लाकडी खुर्ची, त्यावर ठेवलेली पातळशी गादी, भिंतीजवळच्या बाकड्यावर पिवळी पडलेली अत्यंत जुनाट सिनेमाची मासिकं (त्यातल्या तरुण नट्या आता दोन दोन कच्च्या बच्च्यांच्या आया झाल्या असतील किंवा त्यात छापलेला हीरो आजच्या तारखेला बापाचे रोल वठवित असेल), खुर्चीच्या पाठीवर पडलेली कळकट्ट टॉवेलं, छताला टांगलेला गंजलेला जुनाट पंखा. अश्या साऱ्या सरंजामाने नटलेले ते हजामाचे दुकान पाहताच मुल्ला नसरुद्दीनला आपण काल पूर्ण शहराची मिशी साफ करण्याची घेतलेली प्रतिज्ञा आठवली आणि त्याने हजामाशी मैत्री करण्याचे ठरविले. तो त्या दुकानाच्या ओट्यावर येऊन बसला. दुकानाची यथातथा अवस्था पाहूनच समजून गेला होता कि दुकान काही नीट चालत नाही. तेव्हां याला गि-हाईक मिळवून देऊन आपलेही कमीशन काढून आपल्या पोटपाण्याची काही व्यवस्था लागेल या उद्देशाने त्याने संवाद सुरु केला.

   ‘‘सलाम बाबा, हजामतीचे दुकान वाटतं’’
   ‘‘ होय बुवा’’
   ‘‘काय नाव म्हणाला तुझं ?’’
   ‘‘करामत हज्जाम...आणि तुमचं ?’’
   ‘‘मी मुल्ला नसरुद्दीन, कालच या गावात आलो, पण काही चांगला अनुभव नाही आला बुवा आपल्याला.’’
   ‘‘का रे बाबा ? काय झाले ?’’

   मग नसरुद्दीनने खानावळीत घडलेला सारा प्रकार विस्ताराने करामत हजामाला सांगितला मात्र साऱ्या शहराची मिशी उडवायच्या प्रतिज्ञेचा भाग शिताफिने वगळून.

   करामत मान डोलावत म्हणाला, ‘‘ होय, फारच उद्धट नी मग्रुर आहे तो खानावळीचा मालक सद्दाम.

   ‘‘मीही त्याची मिशी उतरवण्याची प्रतिज्ञा घेतलीय’’ मनातच म्हणत नसरुद्दीनने करामतला विचारले, ‘‘बाकी तुझा धंदा कसा चालतोय ?’’

   ‘‘काय सांगू मित्रा’’ करामत बोलला ‘‘काही खरं नाही या धंद्यात, मुळीच गि-हाईकी राहिली नाही बघ ! आलाच तर एखादा येतो फक्त दाढी कोरुन घ्यायला, मग त्याचा पत्ता नसतो महिना दीड महिना. तीच बात डोकं भादरुन घेणाऱ्याची. आता नुसती दाढी कोरुन कोरुन काय धंदा चालणार ? दात कोरुन पोट भरण्याची पाळी आलीये रे बाबा !"

   आपल्या दाढीत हात फिरवत नसरुद्दीन विचार करु लागला व एक योजना सुचताच करामतला म्हणाला, ‘‘करु करु ! काहीतरी युक्ती करु पण मी सांगेन तसं करशील तर गि-हाईकांचा मुळीच तोटा पडणार नाही बघ.’’

   ‘‘काय करावं, तू म्हणशील तसे मी करायला तयार आहे’’ करामत बोलला.

   ‘‘ठीक आहे, वेळ आली की सांगेन तसं कर पण न कचरता कर म्हणजे झालं’’ नसरुद्दीनने सांगितले.

   विषय बदलावा म्हणून मुल्लाने वर तुळईला बांधलेल्या पंख्याकडे पाहात विचारले, "बराच जुना दिसतो पंखा?

   करामत उत्तरला हो रेलवेचा जुना पंखा आहे, माझ्या मामाने आणून दिलाय. माझा मामा रेलवेत भंगार कॉन्ट्राक्टर आहे. रेलवेचा पंखा फक्त कंगव्याने ढकलल्यानेच चालतो. मामा म्हणे तुझ्याकडे आहेत कंगवे, तुझ्याकडे व्यवस्थित चालेल.”

   इतक्यात लांबून येत असलेल्या मौलवीसाहेबांना पहात करामत म्हणाला, " ते पहा मौलवीसाहेब येत आहेत, तब्बल दोन महिन्यांनी फेरी लागतेय यांची."

   नसरुद्दीन म्हणाला, "आता दर चार दिवसांनी येतील अशी व्यवस्था करतो बघ. फक्त त्यांची मिशी तेवढी पूर्ण साफ कर. रागावलेच तर बाकीचे मी बघतो, तू मात्र घाबरु नकोस.’’

   इतक्यात मौलवीसाहेब खुर्चीत येऊन बसले. हाश हुश्श करत त्यांनी पंखा चालू करायला लावला. करामत ने पंख्यात कंगवा घालून पंखा फिरविला. घर्र घर्र आवाज करत पंखा फिरु लागला आणि मौलवीसाहेब खुर्चीत अजून खोल रुतून बसले.

   ‘‘काय करायचं आहे ? दाढी कोरायची आहे कि डोकं भादरायचं आहे ? करामत विचारता झाला.

   ‘‘डोकं भादरलं होतं ना रे मागच्या महिन्यात? दाढी कोरुन दे, इकडे तिकडे खुंट उगवायला लागलेत.’’ मौलवीसाहेब म्हणाले.

   करामतने मौलवीसाहेबांच्या दाढीला साबण फासला आणि हातात वस्तरा घेऊन धार करायच्या पट्यावर सटक फटक करत धार लावू लागला. चांगली धार मारुन झाल्यावर करामतने मौलवीच्या दाढीच्या आसपास उगवलेले खुंट काढून दाढीला व्यवस्थित आकार द्यायला सुरवात केली. इतक्यात मुल्लाने करामतला आपले काय ठरले होते ते आठवण करुन देण्यासाठी खाकरुन इशारा केला. पण करामत मौलवीसाहेबांची मिशी उडवायला धजावत नाही असे दिसताच लगेच मुल्ला नसरुद्दीनने आपली तपकीरीची डबी खिशातून काढली. डबी उघडून नसरुद्दीनने चिमूटभर तपकीर तळहातावर ठेवली आणि मौलवीसाहेबांच्या दिशेने फूंकर मारुन उडवून लावली. फुंकरीने आणि वर फिरत असलेल्या पंख्याच्या मेहरबानीने तपकीरीचे कण मौलवीसाहेब आणि करामतच्या नाकात शिरले आणि दोघंही फटाफटा शिंकू लागले. आणि अशातच हातातल्या वस्तऱ्याचा फटका मिशीच्या डाव्या भागावर पडला आणि मौलवीसाहेबांची अर्धी मिशी त्यांच्या मांडीवर येऊन पडली. 

   शिंका ओसरल्यावर मौलवीसाहेबांचे लक्ष समोरच्या आरश्याकडे गेले. पुसटश्या दिसणाऱ्या आपल्या तोंडाकडे लक्षपूर्वक पहात ते आरश्याजवळ आले आणि आपल्या साफ झालेल्या अर्ध्या मिशीला पाहून एकदम खवळले आणि म्हणाले, ‘‘मूर्खा, काय केलेस तू हे? माझी मिशी उडवलीस? हे असले तोंड घेऊन मी आता कुठे जाऊ? काय म्हणतील लोकं मला? नालायका, मला बाहेर तोंड दाखवायला जागा नाही ठेवलीस तू.’’

   तेवढ्यात मुल्ला नसरुद्दीन मौलवीसाहेबांना म्हणाला‘‘महाशय, आपल्या सारखा भाग्यवान या शहरात कोणी नाही. मी कालच बगदादहून येथे येत आहे. बगदादमध्ये सध्या बिना मिशीची दाढी ठेवायची फॅशन जबरदस्त जोरात चालली आहे. तेथे मिशी असलेला माणूस शोधून सापडायचा नाही. या गावात आयतीच तुमची मिशी उडवून तुम्हाला या फॅशनची दाढी ठेवायचा पहिला चांस मिळाला आहे अन् तुम्ही या करामतला दोष देताय ? तुमची दाढी उरकून आम्हाला आत्ता लगेच बादशहाच्या महालात जायचे आहे, अगदी अर्जंट बोलावणे आलेले आहे. सलीम-जावेदच्या तमाशापटातले ते तिघं हौशी नट काय बरे नाव त्यांचे....हां, सलमानखान, आमीरखान आणि शारुखखान कालंच माझ्यासोबत बगदादहून आलेत. त्यांनाच ही नवीन फॅशनची दाढी सर्वात अगोदर करुन हवी होती. आणि शिवाय बादशहाचे चौघं वजीरही आमची वाट बघत आहेत. सौभाग्याने तुमचा पहिला नंबर लागला. तुम्हाला नसेल पटली तर चार दिवसांनी परत या, पहिल्यासारखी करुन देऊ. चल रे करामत मौलवीसाहेबांना बसव खुर्चीत आणि दोन्ही मिशा सारख्या व्यवस्थित उडव. मग आपल्याला बादशहाच्या महालात जायचे आहे. कदाचित चार पाच दिवस दुकान बंदसुद्धा ठेवावं लागणार आपल्याला. चल आटप लवकर.‘‘

   करामतने मग मौलवीसाहेबांची पूर्ण मिशी व्यवस्थित उडवून सारखी केली व त्यांना उठवून झटक पटक करुन दुकान बंद करण्याचे नाटक करु लागला. मौलवीसाहेब लाजेने तोंडावर हात धरुन तोंड लपवत दुकानातून निघून गेले.

   नसरुद्दीनने करामतला दुकान बंद करायला लावून तीन चार दिवस सुटी करु असे म्हणून दोघे तेथून निघून गेले. चार दिवस दोघं गावभर भटकत राहिले पण दुकानाकडे फिरकले नाहीत. पाचव्या दिवशी सकाळी सकाळी करामत मुल्लासोबत दुकान उघडायला गल्लीत शिरला. गल्लीच्या कोपऱ्यावरुनच त्यांना मौलवीसाहेब आणि बरेचसे इतर लोकं दुकानासमोर कोंडाळं करुन उभे असलेले दिसले. बाजूला बुरक्यात असलेली एक बाई देखील उभी होती. हे सर्व पाहताच करामतची सटारली. 

  तो मुल्लाला म्हणाला, ‘‘ बाबारे या मौलवीचा राग अजून शांत झालेला दिसत नाही, सोबत अजून आठ दहा लोकांना घेउन आलेला दिसतोय मला मारायला. चल पळ काढू येथून, माझा धंधा पूरा बसवलास तू लेका !’’

   नसरुद्दीन म्हणाला, "अरे काय घाबरतोस? बादशहाच्या महालातून येत आहेस तू. साधासुधा हज्जाम राहिलास नाहीस तू आता. शाही हज्जाम आहेस. हा मुल्ला नसरुद्दीन तुझ्या बरोबर असतांना कोण तुला हात लावतो, बघतोच मी. चल घाबरु नकोस.’’

   ते दोघं दुकानापर्यंत चालत चालत आले. तोच मौलवीसाहेब पुढे आले व म्हणाले, "सलाम करामत मियॉं, अरे कुठं होतास ? तुमची दोन दिवसांपासून वाट बघत आहोत आम्ही सारे.’’

   उत्तर नसरुद्दीनने दिले, "तुम्हाला सांगितले होतं ना कि आम्हाला बादशाहाच्या महालात बोलावलं होत. चार दिवस साऱ्या लोकांच्या मिशा काढून काढून हात दुखायला लागलेत या करामतचे. बोला कशाला वाट बघत होता तुम्ही? ’’

   मौलवीसाहेब बोलले,  ‘‘माझी बेगम आली आहे करामतचे आभार मानायला, तीच बोलेल काय ते.’’

   बुरक्याच्या आडून बेगम म्हणाली ‘‘ करामतभाईजान, तुम्ही ही बिन मिशीची दाढीची फॅशन काढून माझ्यावर फारच उपकार केले. त्या करता तुमचे फार फार आभार. आधी यांच्या मिशीत घामाचे, नाक शिंकरल्याचे, पानाच्या थुंकीचे कण अडकून राहिलेले असायचे. नि मग हे रात्री प्रेम करायला जवळ घ्यायचे तेव्हां बाई आमची फारच पंचाईत व्हायची बाई! ’’ बेगमसाहेबा थोडं लाजत म्हणाल्या ‘‘ अन् मग मिशीत अडकलेला थोडा प्रसाद मिशीच्या केसांसोबत आमच्याही तोंडात शिरायचा, अगदी ओकारी आल्यासारखं व्हायचं बघा ! पण जेव्हां तुम्ही यांची मिशी साफ केली मला या कटकटीपासून सुटका मिळाली अन प्रेमात काही अडचण नाही राहिली आता. तुमचे खरंच फार आभार ! मी माझ्या शेजारच्या मैत्रीणिंना हे सारं सांगितलं तेव्हा त्याही फार खुश झाल्या, त्यांनीही आपआपल्या नवऱ्यांना पाठवलं आहे मिशा साफ करुन घ्यायला. हे माझ्या तर्फे छोटसं इनाम स्वीकारा’’ 
  इतके म्हणून तिनं पाच दीनार करामतच्या हातात ठेवले.

   मौलवीसाहेब म्हणाले ‘‘होरे बाबा, मिशा उडवल्यापासून बेगम अगदी खुश आहे माझ्यावर. प्रेमाने जवळ बसते, दूर दूर पळत नाही. आवडली बुवा ही फॅशन आम्हाला. हे पहा माझे शेजारचे मित्रही आलेत आपआपल्या मिशा उडवायला. त्यांच्याही बायका खुश होतील बघ. पण चल आधी ही चार दिवसांची वाढलेली मिशी पटकन साफ करुन दे."

   करामतने ताबडतोब दुकान उघडले व मौलवीसाहेबांची मिशी साफ केली व पाठोपाठ उभे असलेल्या त्यांच्या शेजाऱ्यांचीही बिना मिशीची दाढी करायला नंबर लावून सुरवात केली. आणि एका आठवड्यात होणारी कमाई केवळ तासाभरात त्याच्या पदरात होती.

    नसरुद्दीनकडे पहात करामत म्हणाला‘‘वा रे मित्रा, काय तुझी फॅशनची कहाणी, बादशहाचा महाल नी काय नी काय, मानलं बुवा तुला."

   मुल्ला नसरुद्दीन म्हणाला, ‘‘ अरे बघतोस काय, पूर्ण बसरा शहरात आता ही फॅशन पसरणार आणि दर दोन दिवसानी प्रत्येक माणूस मिशी साफ करायला तुझ्याकडे येणार. तुला वेळ मिळणार नाही यापुढे करामत.
   करामत म्हणाला, ‘‘अरे मुल्ला, ही तुझीच करामत, चल आज मस्त खानावळीत जाऊन मजा करु. मटण मुर्गा हाणू."
               
   थोड्याच दिवसात या फॅशनची किर्ती साऱ्या शहरात पसरली. करामतच्या दुकानात लोकांची रीघ लागू लागली. लोकांना तास तास भर वाट पहात बसावे लागले. करामतनेही दुकान आता व्यवस्थित करुन घेतले. रंगरंगोटी केली, मोडकी खुर्ची जाऊन नवीन खुर्ची आली. भिंतीवर चकचकीत आरसा आला. नवीन कंगवे कात्र्या आल्या. पण पंखा मात्रा करामतने तोच राहू दिला. मामाची आठवण. टेबलावर ताजी सिनेमाची मासिकं आणि गल्ल्यावर पैसे घ्यायला मुल्ला नसरुद्दीन.

   मुल्ला नसरुद्दीनला लोक विचारत, ‘‘कारे बाबा तू नाही मिशी उडवलीस ?’’ तेव्हां मुल्ला हसून उत्तर देई, ‘‘ बाबांनो मी तर सडाफटिंग माणूस, मला तर ना घरदार ना बायको. मला थोडेच कोणाबरोबर तोंडात तोंड घालून प्रेमाच्या गोष्टी करायच्यायेत.’’

   असाच एक दिवस करामतची किर्ती ऐकून तो उर्मट खानावळीचा मालक सद्दामही आला. त्यालाही आपली मिशी साफ करुन घ्यायची होती. मुल्लाने त्याला लगेच ओळखले. त्याचा नंबर लागल्यावर करामतने त्याचीही मिशी उडवली व हजामत केली. हजामतीचे पैसे द्यायला तो जेव्हां नसरुद्दीनकडे गल्ल्यावर आला तेव्हां मुल्लाने त्याला विचारले, ‘‘ काय ओळखलेस का मला ? बोकडाच्या मिशीचा केस आठवला ? धक्के मारुन खाणावळीबाहेर कोणाला काढले होते, आठवले ? तुझ्या मिशीला हात लावणारा मीच तो मुल्ला नसरुद्दीन. समजले ? आज तुझ्या बोकडासकट साऱ्या बसरा शहराची मिशी उडवून लावली का नाही ? आता बैस आपली मिशी कुरवाळत. आज माझी प्रतिज्ञा पूर्ण झाली.’’

   तर अशी आहे ही बिना मिशीच्या दाढीच्या मुच्छकटिकम फॅशनची गोष्ट. आणि हो..... आता बगदादलाही ही फॅशन सुरु झालीय असे कळले, परवाच !


No comments: