Tuesday, January 7, 2020

ळ ची पळापळ



आता हे अक्षरच घ्या....
ळ हे मिळमिळीत अक्षर आहे हे ढळढळीत खोटे आहे. पीळदार शरीराचा ळ असा गुळमुळीत कसा असू शकतो ? आता पळापळीतलाच ळ पहा कसा दोन चाकं लाऊन घरंगळत गेल्यासारखा वाटतो. तसेच पळीतला ळ तेलाला सांडू न देण्यासाठी जणु चंबू करून बसला आहे. आणि गोळीतला ळ म्हणजे चिटकुन ठेवलेल्या दोन गोळ्याच.
पोळी पण गोल आणि भोपळा देखील वाटोळा नाही का ?... आणि हा ळ सुद्धा दोन गोल मिळूनच ना. आणि या दोघांबरोबर गोलाच्या रांगेत सामिल व्हायला ओळीने उभे आहेत गोळी, नारळ, फळ, शहाळं, घंगाळं, घड्याळ.
पण सगळेच ळ काही गोलाशी मैत्री करत नसतात, काही रूळासारखे सरळही असतात तर काही वारुळासारखे वाकडेतिरपेही असतात, फळयासारखे चौकोनी असतात, घुमावदार सुंदर रांगोळीत असतात.
नुसत्या आकारातच नाही तर रंगांमधेही या ळ ने मुसण्डी मारून त्यांना घुसळून ठेवले आहे, काळा, निळा, जाम्भळा, सावळा, ढवळा, पिवळा, गव्हाळ इत्यादि.
दिसतो तितका भोळा नाही हा. उन्हाळा, पावसाळा, हिवाळा... प्रत्येक ऋतुत शिरून बसलेला आहे.
भांड्यांच्या राज्यात पळी-घंगाळीशिवाय याला कुठेच स्थान नाही, इथेच त्याचे पितळ उघडे पडते. तसेच जनावरांच्या राज्यात शेळी आणि आळीपर्यंतच याची मजल. पक्षी म्हटला कि वटवाघूळ, कोकिळा आणि कावळा. झाडांमध्ये केळ, बाभूळ, पिंपळ. फुलांच्या तर पाकळ्या पाकळ्यात हा वसलेला आहे. भाज्यांमध्ये भोपळ्याबरोबर 'घोळ' घालणारा हाच. पण या भाज्यांचे विळी बरोबर सख्य नाही बरं कां !
सर्वात आधी शाळेत अक्षर ओळख होते या ळ ची बाराखडी शिकतांना. याला बोलताना जीभ वळवळत ठेवावी लागत असल्याने मोजक्याच भाषांमधे ळ ला जागा मिळाली आहे, राष्ट्रभाषेत याला मुळीच स्थान नाही. पण मराठीतून हा वेगळा करता येण्यासारखा नाही, याला वेगळा करताच मराठी लुळीच होऊन पडेल, हे काही न कळण्यासारखे नाही.
किती किती घोळ करून ठेवलेला आहे या ळ ने, कुठे कुठे तर गावांच्या नावातही शिरलेला आहे. बेळगांवमधे, जळगांव, पारोळा, तळोदा, तळेगांव यांच्यातही. अजूनही काही नावं असतील. आठवलीत तर 'कळवा'.
मेळा-जत्रा भरल्यावर तिथे ही हा सापडतो भेळेमधे, वेगवेगळ्या जादुच्या खेळांमधे, बर्फाच्या गोळ्यामधे, विजेच्या पाळण्यामधे, गुळशेवमधे...
माळी, गवळी, लुळी-पांगळी, डोळस, आंधळी.... मेळ्यात अश्या कितीतरी लोकांचा समेळ घडवून आणतो. स्वतः आंधळा नसून हा तुमच्याकड़े बुबुळांना रोखून डोळे वटारून बघत असला तरी तुम्हाला याचा गळा धरता येणार नाही.
खरंतर आकाराच्या मानाने याला द्राक्षासारख्या फळाच्या नावात असायला पाहिजे, तर हा कुठे घुसुन बसला त्या लांबोळक्या केळयात.
घुसुन बसण्याच्या बाबतीत याने कोणालाही सोडलेले नाही, आळीत आहे, बोळीत आहे, नळीत आहे, घळीत आहे, खेळात आहे, लाकडाच्या मोळीत आहे, जळाला नियंत्रित करणाऱ्या नळात आहे तर सरणातल्या पेटत्या जाळातही आहे. बाकी हा सगळ्यात मिळून मिसळून राहणारा आहे यात काही वाद नाही. शब्दांच्या मधे असो, शेवटी असो पण हा कधीही शब्दाच्या पुढे राहिला नाही.
पाहिले ... किती धूळदांड उडवून ठेवलेली आहे या ळ ने, जळी-पाताळी-आभाळी सगळीकडे ... मुळीच ताळतंत्र ठेवलेला नाही. सगळीकडे नुसता धुरळा धुरळा करून ठेवला आहे. असा हा मराठीत सगळीकडे धुमाकुळ घालणारा ळ, विरळा शब्दाएवढा विरळा नाही.
रस्त्याला वाकडा करून वळण लावणारा ळ.
कोळी-मासळी यांच्या संगतीत राहणार ळ.
लाकुड़तोड्याच्या मोळीत बांधलेला ळ.
आळश्यासारखा लोळागोळा होऊन पडलेला ळ.
पोरांना गोळा करून खेळ खेळणारा ळ.
बाळापासून बोळक्या तोंडांच्या आजी-आजोबांना खळखळून हसवणारा ळ.
किती किती रूपं आहेत या ळ ची. सर्व काही सुरळीत ठेवूनही सकाळ संध्याकाळ तुम्हाला सळो कि पळो करून ठेवणारा हा ळ....
वेळी अवेळी पळे पळे मोजीत नेहमी तुमच्या संगे असते ही ळ ची नाळ.... बाळाच्या पाळण्यापासून चितेच्या जाळापर्यंत!
अश्या या ळ चे महत्व तुम्हाला कळालेच असेल असे माझे प्रांजळ मत आहे, तरी वेळात वेळ काढून ही ळ ची आगळी वेगळी गम्मत, सगळीच तुम्ही अनुभवली असेल.
आता पूरे झाले ळ चे आळोखेपिळोखे.. तुम्हालाही कंटाळा आला असेल, म्हणून आता करू या एकदा टाळी वाजवून आळीमिळी गुपचिळी.
- लळानंद !
(विवेक भावसार)

No comments: