Monday, May 18, 2020

अघटित

अघटित

एका हिल स्टेशनवरची ती वादळी संध्याकाळ, जून महिन्याचा पहिला आठवडा, सुसाट वारा घोंघावत होता. वाऱ्यामुळे झाडे-झुडपे जोरजोरात हलत होती. पानांची सळसळ आणि बेभान वाऱ्याचा आवाज वातावरणात घुसमळत होता. आकाशात अचानक काळे ढग गोळा झाले होते. अंधार होत आलेला आणि त्यात विजाही कडकडू लागल्या होत्या. कोणत्याही क्षणी पाऊस पडायला सुरवात होईल अशी परिस्थिति झालेली होती. 

डोंगराच्या वळणावर एका बाजूला लोकवस्तीपासून बराच दूर असलेला तो बंगला फार जुना असून तेवढाच भयाण वाटत होता. कोणी तेथे रहात असेल अशी शक्यताही त्या बंगल्याची अवस्था पाहून वाटत नव्हती. त्याच्या समोरुन जाणाऱ्या रस्त्याचे धोकादायक वळण, "अपघाती जागा- सावधपणे वाहने चालवा" अशी पाटी असलेल्या पार्श्वभूमिवर तर तो बंगला जास्तीच भेसूर दिसत होता. अशातच लाईट गेलेले. त्याच वेळी बंगल्याच्या फाटकासमोर एक नवविवाहित असावे असे एक जोडपे उभे होते. बहुतेक आश्रय घेण्याच्या आशेने आले असावे असे वाटत होते.

जोडप्यातल्या पुरुषाने त्या बंगल्याचे फाटक वाजवले. पण आतून काही प्रतिसाद आला नाही. म्हणून ते दोघे फाटक ढकलून आत शिरले. गंजलेले फाटक ढकलण्यासाठी नाही म्हटले तरी थोडा जोर लावावाच लागला. कर्रर्र आवाज करत फाटक उघडले. आत शिरून त्यांनी बंगल्याच्या मुख्य प्रवेशद्वारावर जोरदार थाप दिली. काही वेळाने बंगल्याच्या बाजुला असलेल्या आउटहाऊसमधल्या खोलीतून काही खुडबुड ऐकू आली आणि खोलीचे दार हळू हळू उघडले गेले. आतून एक म्हातारा संथपणे बाहेर आला व त्याने हातातला कंदील उंच करून जोडप्याच्या चेहऱ्यांवर धरला. त्याला पाहून कोणालाही थरकापच भरला असता, कारण त्या बाबाचा एकूण अवतारच तसा होता. एखाद्या भयपटात दाखवतात तसाच एकंदरीत अवतार होता. घनदाट वाढलेल्या काळ्या पांढऱ्या केसांच्या जटा, अस्ताव्यस्त वाढलेली दाढी, खोल गेलेले डोळे, पिचकलेले गाल, लोम्बत्या ओठातून दिसणारे दोन चार काळे पडलेले दात, घामाने कळकट्ट मेणचट झालेले कपडे. एकूण अश्या अंधारात ते ध्यान कोणाच्याही मनात धडकी भरवणारेच होते.
हातातली विझत आलेली वीडी खाली फेकत थरथरत्या आवाजात त्याने विचारले, "काय पायजे?"

"बाबा, आम्हाला रात्रभर रहायला जागा मिळेल का? आमची गाडी खाली बन्द पडली आहे आणि पाऊस सुरु झालेला आहे. वस्ती पण दूर आहे, तर इकडे रात्र काढायला जागा मिळाली तर बरे होईल."
तरुणाने पुढाकार घेत विचारले.

"ठीक हाये, बंगल्याची खोली उघडून देतो तुम्हास्नी, तुम्ही रव्हा पायजे तर रातभर" एक भेदक नजरेने बघत तो म्हातारा बोलला. "आन बरे झाले तुम्ही आला इकडे, मागल्याच आठवड्यात खालच्या वळणावर एक गाड़ी गेलं घसरत की हो त्या वडाच्या झाडावर, जागच्या जागी ठार झाले त्यातलं नवं जोडपं म्हनं."

आपल्या खोलीत जाऊन त्याने किल्ल्यांचा जुडगा आणला आणि बंगल्याचे मुख्य दार उघडून दिले, हातातला कंदील एका खोलीतल्या टेबलावर ठेवत म्हणाला, "इथे रात काढू शकता तुमी, खोली थोड़ी घान हाये, लइ दिवसानी उघडली हाये.  पन एक सांगतो, खायला बियला काही भेटनार न्हाई. अगदी चहा बी न्हाई, सकाळी एक गवळी पावशेर दूध देऊन जातो तेवढेच असते. ते बी संपल्याले हाये. आता सकाळीच मिळेल चहा."

"चालेल हो बाबा, आम्हाला खायला काही लागणार नाही, तुम्ही काळजी करु नका."

"सामान कुठं हाय व्हय तुमचे?"

"बाबा, गाडीमधेच आहे, आता आणायला गेलो तर भिजून जाऊ, पडू दे तिथेच. आता काही गरज पडेल असे वाटत नाही."

"बरं बरं, आनलं असतं तर बरं झालं असतं !"

"एकटेच असता का दादा?"

"होय रे बाबा, कोण नाही माज्या बिगर इथे, आमचे घरमालक भाईर देशात असत्यात, चार पाच सालात येतात कंदीतरी. मला ठेवलेला हाये राखण करायला. पन तुम्ही सम्भालून असा बर कां, जावा आता झोपा जाऊन. रात्रीचे पाखरू घुबड जरा धींगाना घालत्यात, तवा घाबरू नकासा"

म्हणत म्हातारा ओठ तिरके करत एक कुटिलसे स्मित करत होता असे एखाद्याला त्यावेळी पाहतांना वाटले असते. पण त्या जोडप्याने त्याकडे लक्ष दिले नाही. दार लावून ते आत बन्द झाले. त्यांचा आनंदाने  हसण्याचा आवाज बाहेर ऐकू आला.

अंधार आता गहिरा झाला होता, मिट्ट काळोख पडला, हाताला हात नाही दिसणार अशी परिस्थिति होती. पावसाने जोर धरला होता. अधुन मधून विजा कडाडत होत्या, तेवढाच काय तो उजेड पडायचा. अर्धा तास जोरदारपणे पडून पाऊस आता हळू हळू मंद होत चालला आणि शेवटी बन्दही पडला. इतका वेळ येणारा पावसाचा आवाजही बन्द झाला होता. सगळीकडे भयाण शांतता पसरलेली होती. रातकिड्यांच्या आवाजाव्यतिरिक्त कुठलाही आवाज आता ऐकू येत नव्हता. 

मध्यरात्रीची वेळ झाली असावी बहुधा. अंधारात दार उघडल्याचा आवाज आला, दोनच मिनिटांनी दूसरे एखादे दार ढकलून उघडण्यात आले असावे असे वाटले. काही वेळाने एक जोरदार किंकाळीचा आवाज आसमंतात घुमला आणि परत शांतता पसरली. दूरपर्यंत ती किंकाळी कोणी ऐकली असेल याची अजिबात शक्यता वाटत नव्हती, आणि ऐकली असती तरी लगेच कोणी धावत येणार नव्हते. परत खोलीच्या दारापर्यंत चालण्याचा आवाज आला आणि खोलीचे दार बन्द झाले आणि गुप्प शांतता पसरली. काय घडले असेल तेथे, काही अघटित घडले असेल काय?

रात्र संपून सकाळ उजाडली, नेहमी प्रमाणे सकाळी दूध देणारा गवळी आला आणि फाटकातूनच दुधासाठी आवाज दिला. पण आतून प्रतिसाद आला नाही, म्हणून तो फाटक ढकलून आउटहाऊसच्या खोलीपर्यंत आत गेला तर एक भयानक दृश्य त्याच्या नजरेस पडले. ते पाहून त्याचा थरकाप उडाला.
बंगल्याचा तो म्हातारा राखणदार त्याच्या खोलीत मरून पडलेला होता. त्याची बुबुळे आणि जीभ बाहेर आलेली होती जणु कोणी गळा दाबून त्याला मारण्यात आले होते. ते पाहून गवळी घाबरून बाहेर पळाला व गावात जाऊन पोलिसांना त्याची वर्दी दिली. 

काही वेळातच पोलिसांची जीप येऊन थडकली. अधिकाऱ्यांनी खोलीत येऊन प्रेत पाहिले. नंतर बंगल्यात शिरून सगळ्या खोल्या तपासल्या. एका खोलीतील बेडवरच्या विस्कटलेल्या चादरी शिवाय काहीच विशेष लक्ष देण्यासारखे दिसले नाही. सगळ्या खोल्या धूळीने माखलेल्या होत्या. निरीक्षण झाल्यावर राखणदाराचे प्रेत अम्ब्युलेन्स मधे घालून नेण्यात आले.

पोलिस गाडी आणि अम्ब्युलेन्स निघुन जाताच बंगल्याच्या हॉलमध्ये खिदळण्याचा आवाज आला. 
"आता इथे आपले दोघांचेच राज्य. अपघातानंतर गेले आठवडाभर त्या झाडाच्या फांद्यांवर बसून दिवस काढत कंटाळलो होतो. किती दिवस असे काढणार? त्या बाबाचा अडसर ही आपण दूर केला काल रात्री. आता या बंगल्यात आपण दोघेच, फक्त तू आणि मी." जोडप्यातील पुरुष तिला सांगत होता. तितक्यात त्याच्या खांद्याला मागून कोणी हाताने शिवले आणि थरथरत्या आवाजात विचारले, " मी बी तुमच्या संगट राह्यलो तर चालंल का रे बाबांनो"
त्याने मागे वळून पाहिले तर मागे तोच कालचा म्हातारा बाबा उभा होता.

-विवेक भावसार

No comments: