Wednesday, August 7, 2019

माझे अध्यक्षीय भाषण !


जेव्हां पासून र ला... फ, किंवा फ ला... ट न करता, ऊठ ला सूठ आणि रफा ला दफा अशी यमकं जुळवून कविता करायला लागलो व माझ्यासारख्या अनेक कविंसोबत मैफली गाजवल्या तेव्हांपासून माझी गणना नामवंत कवि म्हणून व्हायला लागली. मग अशातच अनेक गावातून कवि सम्मेलनातून आमंत्रणं येवू लागली. प्रसिद्धि वाढत गेली. वाढत वाढत इतकी वाढली की आता लोक मला कवि सम्मेलनाच्या अध्यक्षतेसाठी बोलवायला लागले. आता किती म्हटले तरी लोकांच्या आग्रहाला नकार देता येत नाही नां ! करता काय? मग अनेक वेळा अशा सम्मेलनांचे अध्यक्षपद यामुळे मला भूषवावे लागते.

आता अध्यक्षपद आलं की अध्यक्षांच भाषणही आलंच. आता प्रत्येक वेळी काय नि कसे भाषण करायचं म्हणून मी या भाषणाचा एक फार्म्युलाच तयार करुन ठेवला आहे. आता तुम्ही आपलेच, म्हणून मी हा फार्म्युला सांगतो तुम्हाला, न जाणो कधी तुम्हालाही अध्यक्षीय भाषण कराव लागलं तर, काय सांगता येतं, नाही कां ? 

त्याचं असं आहे, ज्या गावी निमंत्रण असेल, तिथली भौगोलिक परिस्थिती, नदी, नाले, टेकड्या, मंदिरे, तेथली प्रसिद्धि पावलेली ऐतिहासिक किंवा इतर क्षेत्रातील व्यक्तिंची माहिती हळुच कार्यक्रमा आधी निमंत्रकांना विचारुन घ्यावी. कारण या माहितीची भाषण देतांना फारच मदत होते. 

तर जेव्हांही असे भाषण देण्याची पाळी येते तेव्हां माइक वर आल्या आल्या सर्वात आधी माइक हलवून, खाली वर करून एडजेस्ट केल्या सारखे दाखवावे, म्हणजे श्रोत्यांवर आपण एक सराईत वक्ता असल्याची छाप पडते. त्यानंतर व्यासपीठावर बसलेले प्रमुख पाहुणे व इतर मान्यवर मंडळींना नमस्कार-चमत्कार, वंदन-अभिनंदन वगैरे नेहमीचे सोपस्कार करुन समोर बसलेल्या श्रोत्यांची स्तुति करुन टाकावी. पहिल्या ओव्हरलाच स्तुतिचा असा बॉल टाकला की श्रोते खुश होतात आणि मग तुमचे भाषण हूट वगैरे होण्याची शक्यता कमी होते. 

पुढे मग गावाची थोडी तारीफ करावी. गावातल्या एखाद्या ऐतिहासिक वास्तूचे, देवळाचे, नदी-तलावाचे, रस्त्याचे, गावात जन्मलेले कोणी महान संत, महापुरुष, साहित्यिक यांचे गुणगान केले की श्रोत्यांना मनातल्या मनात आनंदाच्या उकळ्या आणि हातांनी टाळ्या फुटू लागतात. मग मात्रा तुमच्या भाषणात अडथळा आणायची कोणाची काय बिशाद! 
 
नंतर...मूळ विषयाला हात घालण्यापूर्वी स्वतःबद्दल थोडे बढाईपूर्वक सांगावे. आपले लहानपण, बालपणातला हुडपणा, समंजसपणा, विद्यार्जनासाठी घेतलेली मेहनत, अडचणींना दिलेले तोंड, आपले प्रेरणा देणारे व्यक्ति, यांच्याबद्दल सांगावे. नंतर साहित्य क्षेत्रात कसा प्रवेश केला ते सांगावे. यामुळे श्रोत्यांच्या मनात आपली प्रतिमा मेहनती व अभ्यासू म्हणून दृढ होत जाते व श्रोते आपल्याला आदराने पाहू लागतात.

इतके सगळे बोलून झाल्यानंतर मूळ विषयावर यावे. त्या विषयाची माहिती आपल्याला असली तर उत्तमच, नाही तर काही थातूर मातूर बोलून मोकळे व्हावे. नाहीतरी श्रोते आपल्या पूर्वीच्या भाषणामुळे गपगार झालेलेच असतात. त्यांच्या कामाचे-स्तुतिचे त्यांनी ऐकून झालेले असते. शेवटी, एखादे संदेशपर वाक्य बोलून आपली एखादी रचना ऐकवावी व भाषण संपवावे.

सांगायला आनंद होतो कि हे जे गुपित आत्ता मी तुम्हाला सांगितले आहे, ते उघड होण्यापूर्वीच मोठ-मोठ्या साहित्यिकांनी-इतकेच काय आपल्या पंतप्रधानांनीही आपली अध्यक्षीय भाषणे या फार्मूल्याचा उपयोग करुन आपल्या सभा गाजवल्या आहेत. 

मला माहित आहे, हे सगळे तुम्हाला एखादे उदाहरण दिल्या शिवाय पटणार नाही. म्हणून मी एक माझाच अनुभव तुमच्या पुढे ठेवत आहे. मागच्याच महिन्यात मला मौजे डामरटवाडीला तेथल्या तिसऱ्या अखिल भारतीय वार्षिक कवि संमेलनाचे अध्यक्ष म्हणून आमंत्रण होते. गावाच्या नावाप्रमाणेच तेथले लोकही फारच डामरट आहेत. माझ्या कानावर होते कि आधीची दोन संमेलने या लोकांनी मोठ्या प्रयत्नाने उधळून लावली होती. पण माझ्या अध्यक्षीय भाषणाने मी अशी काही छाप सोडली कि संमेलन उधळून लावण्याऐवजी लोकांनी मलाच डोक्यावर उचलून धरले. नाही म्हणायला सुरवातीला एखाद-दुसरा लहानसा प्रयत्न झालाच उधळण्याचा.... पण मी काही दाद लागू दिली नाही. 

त्याच वेळचे माझे भाषण मी आता तुमच्या पुढे सादर करित आहे.

‘‘व्यासपीठावर विराजमान येथले लोकप्रिय आमदार व आजचे प्रमुख पाहुणे श्री बुचकेपाटिल, ज्यांनी माझी या अध्यक्षपदासाठी जोमाने शिफारस केली असे माझे परम मित्र डामरटवाडीचे संरपंच श्री सोमाजी टोणगे, आजचे विशेष पाहुणे आदरणीय श्री चावरे सर, मंचावर उपस्थित राष्ट्रीय कीर्तिप्राप्त माझे सारे कविमित्र श्री कोमल लवचिके ‘दगड’, कुमारी स्नेहल ‘प्रियकर’, श्री नरसू केकाटे ‘मधुर’, श्री रंगोबा बोचरे ‘काटा’, श्री काळू बेरड, श्री आंबुसराव तांदळे ‘स्वच्छ’ आणि डामरटवाडीतील सर्व रसिक, गुणग्राही, उत्साहवर्धन करणारी श्रोते मंडळी.

मित्रहो ! तुमची कवि संमेलनाबद्दल असलेल्या प्रेमाची, रसिकतेची कीर्ति आधीच माझ्या कानी आली आहे. कवि संमेलन म्हटलं की तुम्हा सर्वांना एक मनस्वी आनंद होतो हे मला ठाऊक आहे. या सम्मेलनाचं अध्यक्षपद मला देऊन आपण माझ्यावर जो लोभ व विश्वास व्यक्त केलात, त्या बद्दल मी आपला अत्यंत आभारी आहे. मराठी साहित्याच्या सेवकाला त्याच्या चाहत्यांच्या तर्फे मिळणारा हा एक मोठाच मान असतो. तो मान आपण मला दिलात, हा माझा नव्हे तर तुमचाच मान आहे असे मी समजतो. या मानासाठी नुसते शाब्दिक आभार मानून मी कसा उतराई होऊ. मी एवढंच सांगीन कि आजपर्यंत केलेली सर्व साहित्य सेवा तुमच्या सर्व रसिकांच्या चरणी अर्पण करतो. या क्षणी मला मच्छीकरांची एक कविता आठवत आहे. त्यांच्याच शब्दात सांगायचे म्हटले तर-
आणले चार मासे,
अर्पण करतो दोन तुला मी
उरले रे दोनच आता
चार सांगितले होते आणाया
घरी नेऊ मी हे कसे
तूच ठेव हे चारही मासे
आणले चार मासे.... 

असो, तर म्हणायचा अर्थ असा की माझी सर्व साहित्य सेवा तुम्हाला अर्पण केल्यावर माझे काय उरले, सर्व तुमचेच.

मित्रहो ! या मौजे डामरटवाडी गावाला फार थोर परंपरा लाभली आहे. गावाला वळसा घालून वाहत असलेल्या कळसा नदीचे पाणी पिऊन पिऊन मोठमोठ्या साहित्यिकांनी प्रेरणा घेतली आहे (उधळण्याचा प्रयत्न, श्रोत्यातून एक जण - अहो ... नदी नाही, नाला आहे तो नाला ) मी म्हणतो चला नाला तर नाला, यात पाणी वाहते आहे हे काय कमी आहे ? तर या अत्यंत पवित्र अशा कळसेच्या काठी असलेले नवसोबा भैरवाचे मंदिर तर आख्या भारतात प्रसिद्ध आहे. त्याच्या दर्शनाला फार लांबून लांबून म्हणजे पंचक्रोशितल्या सर्व गावांतून भाविक येत असतात. आमचे आदरणीय श्री बुचके पाटिल यांच्या प्रयत्नाने मागील पांच वर्षांपासून दरवर्षी भरणारी या भैरवाची 3 दिवसाची जत्रा नाशिकच्या कुंभमेळ्याच्या तोडीची असते. तर अशा थोर, महान व पौराणिक व पूर्वापार चालत आलेली परंपरा लाभलेली जत्रा भरणाऱ्या या भैरवाच्या नगरीत मला येण्याचे भाग्य लाभले हे मी माझे परम भाग्यच समजतो.

थोर अंतरराष्ट्रीय संत नारायणबोवा कीर्तनकार इथलेच, आसपासच्या दहा-बारा गांवांना आपल्या कीर्तनाने गाजवणाऱ्या संतश्रेष्ठ नारायणबोवांना विठ्ठलाचे नाव घेऊन मी श्रद्धापूर्वक नमन करतो.

विश्वकीर्ति लाभलेले आमदार बुचके पाटिल, ते ही येथलेच. वारंवार विधानसभेत अडथळा आणून टीव्ही कॅमेऱ्याच्या माध्यमाने प्रसिद्धिच्या झोतात येऊन देशप्रेमाचे उदाहरण घालून देणारे श्री बुचके पाटिल यांना मी अडथळा न आणू देता नमन करतो.

मागच्या दसऱ्याला तालुक्यातल्या सर्व पैलवानांना धूळ चारुन विश्व प्रसिद्धि पावलेले श्री बंडू दाणगट पैलवान देखिल या डामरटवाडीचेच. आलंपिक मधे भाग घेऊ इच्छित अशा नामांकित बंडू पैलवानांना मी लांबूनच नमन करतो.

वर्गात एकही दिवस न शिकवता पोरांना पास करत करत आठवीपर्यंत आणून पोचवणारे चावरे मास्तरही याच गावचे भूषण. आदर्श शिक्षकाचे राष्ट्रपति पदक मिळविण्यात थोडक्यात हुकलेले हरहुन्नरी अशा चावरे सरांना मी कान धरुन नमन करतो.

डामरटवाडी म्हटली की इथले भट्टी लावणारेे सोन्या गाळकर आठतात, संपूर्ण गावाला गाळून गाळून शुद्ध केलेले पेय पुरवणाऱ्या गाळकरांनी शुद्धतेचा एक आदर्शच गावापुढे घालून दिलेला आहे. खरे म्हटले तर यांना स्वच्छता मिशनचे ब्रांड अॅम्बेसेडर करायला कोणाची काहीच हरकत नसावी.

यानंतर लागलीच आठवण येते ती गान-नृत्यकला प्रवीण मंजूळाबाईं सतावकरीण यांची. आपल्या गायन व नृत्य कलेने अख्या महाराष्ट्रात धमाल उडवून लावणाऱ्या आणि भल्या भल्यांना घरदार सोडून देत सतावण्याइतके वेड लावून फड गाजवणाऱ्या जग प्रसिद्ध मंजूळाबाईंना, आणि त्या फडात आम्हाला पहिल्या धारेची पुरवणाऱ्या सोन्या गाळकरांसोबत फडात आम्हाला कायम साथ देणाऱ्या पोलिस पाटिल श्रीयुत खाशाबा जाधव यांनाही आम्ही गजरा बांधलेल्या हातांनी पेला उंचावून सलाम करतो.

तर सांगण्याचा अर्थ असा कि आज जरी शहरात रहात असलो तरी या गावातच आम्ही लहानाचे मोठे झालेलो आहोत. कळसा नदीचे पाणी आम्हीही चाखले आहे. (गर्दीतून एक जण- सोन्या गाळकरांच्या भट्टीत तेच वापरतात बरं का) .... तर याच गावात आम्ही चावरे सरांच्या मार्गदर्शनाखाली कोमल लवचिके, स्नेहल प्रियकर यांच्या मांडीला मांडी लावून कविता करायला लागलो. मला मिसरुड फुटायच्या आधीच माझी पहिली कविता फुटली ती चावरे सरांमुळेच. झाले काय कि पाचवीत असतांना वर्गात मी पाटीवर ‘माझी प्रिय कविता’ असे लिहून माझ्या मागे बसलेल्या कविता लुटपुटेला पाटी दाखवत होतो तेव्हढ्यात चावरे सरांनी पाहिले व वाचून दाणकन हातातले डस्टर पाटीवर फेकून मारले आणि अशा प्रकारे माझी पहिली कविता आणि पाटी बरोबरच फुटली. पण मी निराश न होता सरांचे उट्टे काढायच्या मिषाने... मिशा नसलेल्या सरांच्याच हजेरीपटाचे पान गुपचुप फाडून त्या कागदावर कविता लिहीली अन मग ती ‘कविताला’ दिली. ती माझी पहिली कविता अशी होती -

माझी प्रिय कविता,
मार सरांचा चुकविता !
झाली ओली विजार,
घातली तशीच न सुकविता !!
.....माझी प्रिय कविता

तर मित्रांनो, अशी माझी सुरवात झाली. बालपणापासूनच प्रतिभा समोर होती. कारण कविता मागे असायची. हळु हळु प्रगति होत गेली. प्रतिभा, कविता आणि प्रगतिमुळे व सरांचे मार्गदर्शन मिळत गेल्याने मी शेवटी एकदाचा कवि झालो. पुढे डामरटवाडीतून प्रसिद्ध होणारे शंभराच्यावर प्रसार संख्या असणारे मंजुळाबाईंचे देशप्रसिद्ध साहित्यिक मासिक ‘मंजुळ चाळे’ यांत त्यांच्या फडाच्या जाहिराती बरोबर माझ्या काही कविता छापून आल्या व साऱ्या जगाला माझी ओळख पटली. यात या सर्वांचे श्रेय आहे, प्रेम आहे.... म्हणूनच मी आज तुमच्यापुढे आज असा धडधाकट उभा आहे.
तसे पाहिले तर माझ्या साहित्यावर बऱ्याच लोकांची छाप आहे, तरी त्यात प्रमुख म्हणून नाव घेता येईल तर आमचे मुंबई-पुण्याचे बरेच प्रकाशक.... सुरवातीला माझ्या कविता मी मुंबई, पुणे येथील प्रसिद्ध प्रकाशकांना पाठविल्या, पण त्यांनी ‘नापंसत-साभार परत’ अशा शिक्क्यांचे छाप मारुन परत पाठविल्या. अशा प्रकारे त्यांनी माझ्या साहित्यावर आपली पहिली छाप पाडली. पण मी डगमगलो नाही. नंतर माझ्या मित्रांच्या सहयोगाने वर्गणी करुन मग मी त्या स्वतःच प्रसिद्ध केल्या. डामरटभूषण या पुरस्काराने मागील वर्षीच तुम्ही लोकांनी माझा या संग्रहाच्या निमित्ताने सम्मान केला आहे. आता स्वतःचीच काय सारखी स्तुति करावी. ते आता तुम्हां लोकांचे काम आहे.

माझ्या या भाषणाच्या शेवटी माझी एक कविता सादर करित आहे. या कवितेची चमत्कृतीपूर्ण अशी एक विशेषता आहे.... ती म्हणजे दोन दोन ओळींची कडवी आहेत, त्यातल्या दोन्ही ओळींचा शेवट एकाच शब्दाने केला आहे पण दोन्ही ओळीत त्या शब्दाचा अर्थ वेगवेगळा आहे.
उदाहरणादाखल आधी दोन दोन ओळींच्या काहीं स्वतंत्र रचना म्हणत आहे, त्यानंतर एक मोठी रचना प्रस्तुत आहे.
(भाषणासाठी तुम्हां सर्वांसमोर उभा राहून माझी काय अवस्था झाली आहे पहा या दोन ओळीत)

पाहून सर्व झालेले गोळा
उठतो रे पोटात गोळा


(ढोंगी साधू लोकांविषयी म्हटले आहे ज्यांचा वरचा देखावा वेगळा असतो आणि आतला कारभार वेगळा असतो, त्यासाठी दोन ओळी )

रामनाम जो भजे
तोच खाई रे भजे


(शेजाऱ्याची वस्तु मागून घेण्याचा शेजारणिचा शेजार धर्म पहा कसा असतो, त्यासाठी दोन ओळी )

दळावयास दे गं जाते
घेउनी मी ते घरीच जाते


(लांबचा प्रवास करुन घाम-धुळीने माखलेल्या चेहऱ्याने मित्राकडे आल्यावर)
कोण तू,? तो मला पुसे
मग मी ओशाळून तोंड पुसे

.
.
.
या दोन दोन ओळींनंतर याच धर्तीवर एक दीर्घ कविता प्रस्तुत आहे
थंडगार ही हवा
अशात गरम चहा हवा ।
मद्य बरे त्या परि
असे म्हणे ती मज परी ।
परी पुढे म्हणते -
जरी नसे तू मद्यपी
तरी एकदा हे मद्य पी ।
थंडी जरी असे तरी
आणते हे तर तरी ।
धरला कां ? हात सोडा
आणते मी बर्फ सोडा ।
थंडगार ही हवा
अशात मद्य चषक हवा ।
मी म्हणतो -
लागे हे अति चव दार
पण आधी ते लाव दार
पाहून विचारतील कोण प्याला
तरी दे अजूनी एक प्याला ।
कवटाळला हा चषक उरी
बाटलीत ना त्या काही उरी ।
थंडगार ही हवा
फक्त तुझा संग हवा ।
शेवटी संत तुकाराम महाराजांच्या शब्दात निरोप घेतो,
आम्ही जातो अमुच्या गावा
पुढचा पाठ तुम्हीच गावा ।
तुम्ही सर्वांनी माझे भाषण शांततापूर्वक ऐकले, भाषणामध्ये एकदाही टाळ्या वाजवून अडथळा आणण्याचा प्रयत्न केला नाही त्याबद्दल अनेक आभार आणि सर्वांना नमस्कार !
-अध्यक्षानंद !
(विवेक भावसार)

No comments: