Tuesday, July 2, 2019

"झोप" ... एक गंभीर चिंतन


झोप .... रात्री गादीवर उताणे पडल्यावर थोड्या वेळाने शुद्ध हरपण्याची अवस्था.
एकदा का झोप लागली, कि माणसाला कशाचीच शुद्ध रहात नाही. तो घोरतोय का तोंड उघडे पडलेले आहे, आसपास गोंगाट होत आहे का टीवी-रेडियो चालू आहे, पांघरूण अंगावरून घसरलेले आहे कि स्वतः झोपणाराच गादीवरून घसरलेला आहे का अंथरूणात उलथा पालथा झालेला आहे, स्वतः गादीवर आहे कि गादीखाली गेलेला आहे, कशाचीच म्हणजे... कशाचीच शुद्ध रहात नाही.
झोप येण्याची प्रमुख जागा म्हणजे घर. पण ही घराशिवाय इतर ठिकाणीही प्रामुख्याने सापडते. त्यात पहिला नंबर म्हणजे कचेरी. त्यानंतर शाळा-कॉलेजचा वर्ग, सार्वजनिक सभेच्या सभासदांची मीटिंग, जाहीर सभा-व्याख्यान, शास्त्रीय संगीताचे कार्यक्रम, धार्मिक प्रवचनांचे मंडप आणि सर्वात महत्वपूर्ण ठिकाण - संसद सभा भवन. या सर्व ठिकाणी झोप घेणारे किंवा आवरता न आल्याने झोप येणारे हमखास दिसतात.
कचेरीत जेवण्याच्या सुटीत, खुर्चीच्या दोन्हीं हातांवर आपले पाय फाकवून बरेच महाभाग पडलेले दिसतात. डोक्यावर पंखा किंवा बाजूने कूलर चालू असल्याने, यांना झोपेचा अवर्णनीय आनंद लुटता येतो. पण झोपल्यानंतर कसलीच शुद्ध रहात नसल्याने यांची झोप मस्त चहाच्या सुटीपर्यंत लांबते. अर्थात अशा प्रदीर्घ झोपे नंतर चहा घेणे सहाजिकच असते.
शाळा-कॉलेजात वर्गात शिक्षक रसायन शास्त्र, इंग्रजी किंवा इतिहासासारखा कंटाळवाणा विषय शिकवत असतांना तुम्हाला वर्गात झोप अनावर झाल्याचा अनुभव नक्कीच आला असेल. पहिला बाजीराव, दुसरा बाजीराव, पानीपतची लढाई, शेवटली लढाई, अमुक खान, तमुक खान, जन्म-मृत्युच्या सनावळ्या ही सर्व आकडेवारी ऐकता ऐकता कोण असा वीर असेल ज्याला झोप नाही येणार. अभ्यासाच्या बाबतीत घडणारा झोपेचा असाच दुसरा खास प्रसंग म्हणजे, परीक्षा डोक्यावर आली असतांना अभ्यासाला बसणे. आणि अशा वेळी पुस्तक उघडल्याबरोबर डोळ्यांवर अशी काही पेंग चढते कि विचारू नका. तेव्हां पुस्तक बाजूला ठेवून पहाटे लौकर उठून अभ्यासाला बसायचा निश्चय होतो, आणि हा निश्चय कधीच तडीला जात नाही, हे काही वेगळे सांगायला नको.
सार्वजनिक सभेच्या सदस्यांच्या मीटिंग प्रसंगी, किंवा जाहीर सभेत असेच दृष्य नजरेत पडते. यात बोलणारा वक्ता सोडून, मंचावर उपस्थित सदस्य व समोर बसलेले श्रोते, सारे झोपेत असतात. त्यामुळे वक्त्याला अडथळा, व्यवधान न येता लांबलचक भाषण करण्याचे समाधान मिळते. बऱ्याच सभेचे अध्यक्ष झोपेत असूनही किंचित डोळे उघडून लक्षपूर्वक भाषण ऐकण्याचा बेमालूम अभिनय करण्यात पटाईत झालेले आहेत. अशावेळी पेंगतांना डोके किंचित मागेपुढे डोलत असल्याने लक्षपूर्वक ऐकण्याच्या त्यांच्या अभिनयात भारीच भर पडते. तसेच धार्मिक बाबांच्या प्रवचनात सुद्धा झोपणारे आढळतात. रसाळपणा ऐवजी रटाळपणा सुरू झाला कि लोकांना झोप येणारच.
भारतातले झोपण्याचे सर्वात महत्वपूर्ण ठिकाण म्हणजे लोकसभा-राज्यसभेचे वातानुकूलित सभागृह. इथे बसून झोप घेणाऱ्या खासदारांना आपोआप टीव्हीवर दिसण्याची संधी मिळते...मग असे खासदार रातोरात प्रसिद्धिच्या झोतात येतात... आणि मग त्यांच्या निवडणूक क्षेत्रांतील लोकांना आपला खासदार टीव्ही वर का होईना... निवडणूकीनंतर पहिल्यांदा दृष्टिस पडला याचा अपूर्व आनंद होतो. आपले एक पूर्व पंतप्रधानसुद्धा लोकसभेत झोपण्याच्या कलेत निष्णात झालेले होते. सभागृहात गदारोळ उठला की मात्र अशा लोकांची झोपमोड होते व उठताच गडबडीने ‘जिंदाबाद, मुर्दाबाद, नहीं चलेगी नहीं चलेगी‘ अश्या निरर्थक किंवा विषयाशी असम्बद्ध आरोळ्या देत सुटतात.
एक सभा आणखी, जिथे झोप आवरणे अशक्य होते. ती म्हणजे शास्त्रीय संगीताची सभा. तुम्हाला आवड नसतांनाही, तुमच्या मित्राच्या आग्रहाखातर, तुम्ही तेथे हजेरी लावलेली असते. एक तर या सभा रात्रीच्या असतात, व कधी वेळेवर सुरू होत नाहीत. म्हणजे झोपेची प्राथमिक भूमिका सभा सुरु होण्याअगोदरच तयार झालेली असते. मग कधीतरी साथ संगतकार येऊन बसतात व तंबोरा, तबला तालासुरात जुळवित बसतात आणि आपली निद्रेला थोपवण्याची निष्फळ आराधना सुरु होते. एवढ सगळं झालं की मुख्य गायक येतात आणि गायन आरंभ करत हळू हळू आलाप आळवायला सुरवात करतात. जरा गळा गरम झाला, की पुढच्या ताना सुरू होतात. अशात, त्यातले काहीच न कळणारे आमच्यासारखे माना डोलावून डुलक्या मारू लागतात. या डुलक्यांना आपल्या कलेला मिळणारी दाद समजून हे गायक अजून चवताळतात व ताना मुरक्या दहा दहादा आळवून म्हणत राहतात. पण तोपर्यंत इकडे अशी मस्त समाधि लागलेली असते कि काय म्हणता. म्हणून गायन संपवतांना शेवटली तान जोरात तीनदा मारावी, अशा झोपाळू लोकांना जागे करण्यासाठीच शोधून काढलेली कोण्या एखाद्या कल्पक गायकाची युक्ति असावी... नक्कीच !
किशोरवयात कथा कादम्बऱ्या वाचतांना, अनेकदा असे आढळत असे कि नायक किंवा नायिका झोप न आल्यास, निद्रादेवीची आराधना या गोड प्रकारात लागत असे. मलाही एकदा रात्री झोप येत नव्हती, तेव्हा मी सुद्धा हा प्रयोग करायचा ठरविला. पण पुस्तकात अशी आराधना कशी करावी, याचा काहींच तपशील दिलेला नव्हता. मग मी स्वतःच एक पद्धत ठरवली. मी देवघरातून आरतीचे ताट आणून त्यात एक निरांजन पेटवून गादीत येवून बसलो. पुस्तकात निद्रादेवीच्या आराधनेचा कोणता मंत्र देखिल दिलेला नव्हता. मग मी स्वतःच एक मंत्र तयार केला व आरतीचे ताट ‘ओम् निद्रादेवी शिघ्रम् शिघ्रम आवन्तू’ असे म्हणत पंचवीस-तीस वेळा हवेत ओवाळले. परंतु मला बघण्याची उत्सुकता असलेली ती रूपसुंदर निद्रादेवी येण्याचे काही चिन्ह दिसेना. एवढ्याने कंटाळून मला झोप येवू लागली, पण निद्रादेवी नाही आली ती नाहीच. पण काही वेळाने निरांजन लवंडण्यामुळे, गादी पेटून निघाली व चटका बसून माझी झोप मात्र परत उडाली.
बऱ्याच लोकांना झोप न येण्याचा विकार असतो. असे लोग रात्रभर जागत विचार करत बसतात, व झोप येण्यासाठी अनेक उपाय करत असतात. अशा लोकांना सल्ले देणारेही बरेच भेटतात. कोणाचा सल्ला असतो, अंथरूणावर पडल्यावर डोळे मिटून, काल्पनिक मेंढ्या मोजत बसाव्या. किंवा ओमचा जप करावा. तर कोणी सल्ला देतो, झोपण्यापूर्वी स्नान करून शतपावली करावी. तर कोणी यासाठी डॉक्टरांकडे झोपेच्या गोळया लिहून देण्यासाठी धाव घेतो. हल्लीच्या मुलांना इंटरनेटमुळे झोप येत नाही. रात्रभर मित्रांशी फेसबुक-व्हाट्स एप संवाद चालू असतो. मात्र या मुलांच्या झोपेच्या वेळा फक्त बदललेल्या असतात. सामान्य लोकांसारखी ही मुलं सकाळी न उठता दुपारी झोपून उठतात...इतकेच. जी मुलं वेळेवर झोपतात व उठतात, त्यांच्याकडे इंटरनेट कनेक्शन नाही हे समजायला हरकत नाही.
मला मात्र झोप येण्यासाठी एक जालिम उपाय सापडला आहे. मला झोप येत नाही, असा प्रसंग क्वचितच येतो. पण जेव्हां ही येतो त्या वेळी, मी एक जाडजूड ऐतिहासिक कादंबरीचे पहिले पान काढून सुरवातीपासून वाचायला सुरवात करतो. आणि पहिले किंवा दुसरे पान संपता संपता, मी गाढ झोपेत चालला जातो. पंधरा वर्षांपूर्वी घेतलेल्या, या पांचशे पानाच्या कादंबरीची, आतापर्यंत फक्त तीनच पाने मी वाचू शकलो आहे, या वरूनच समजेल की हा उपाय किती रामबाण आहे. माझ्या दिवाणखान्यातल्या कपाटातली जाडजूड पुस्तके पाहून, लोक माझ्या अभ्यासू वृत्तिचे उगीचच कौतुक करतात, पण ती सर्व पुस्तके केवळ झोपेच्या रामबाण गोळया आहेत, हे गुपित मी अजूनपर्यंत लपवून ठेवलेले आहे.
बऱ्याच लोकांना सवय असते, की झोपतांना ज्या स्थितित ते अंथरूणात शिरतात, उठतांना वेगळयाच मुद्रेत आढळतात. असे लोक अगदी मोकळेपणाने झोपतात. झोपेत पाय हात चौफेर फिरवत असतात. शेजारी झोपलेल्या माणसाची गादीही आपलीच आहे असे समजून, झोपेत तिथे आपल्या तंगड्यांनी सर्जिकल स्ट्राईक करून परत येतात. सकाळी उठतांना पायाच्या जागी डोके व उशीवर पाय पसरलेले असतात. झोपतांना पाठ गादीवर टेकलेली असते ती सकाळी उठतांना आकाशाकडे असते. या उलट काही लोक ज्या मुद्रेत झोपायला जातात, अगदी तसेच सकाळी उठतात. अंथरूणाची एक सुरकुती इकडे का तिकडे नाही. फारतर पांघरूण इंच दोन इंच खाली वर सरकलेले. जसा काही मुडदाच रात्रभर गादीवर पडला असावा. असे लोक रेलवेच्या बर्थवर किंवा इस्पितळातल्या स्ट्रेचरवर झोपायच्या एकदम लायकीचे. मलाही माझ्या अशा झोपण्याच्या सवयीचा फार राग येतो. छट् ! असे काय झोपायचे मुडद्यासारखे. झोपावे तर मोकळेपणाने हात पाय पसरून, नाही तर काय ? शेजारी झोपणाऱ्याला रात्री जरा लत्ताप्रसाद द्यावा, कधी त्यांचे पांघरूण आपल्यावर ओढून घ्यावे, तर कधी त्याला अंथरूणावरून बाहेर ढकलून द्यावे, तरच काही मजा!
वैज्ञानिक सुद्धा सांगतात, कि झोप ही माणसाच्या आरोग्यासाठी अत्यंत महत्वाची गोष्ट आहे. परंतु वाटते कि शाळावाले आणि ऑफिसातल्या बॉस लोकांचा यावर अजून विश्वास बसलेला नाही.
झोपेचा एक महत्वाचा भाग, तो म्हणजे स्वप्न. तुम्हाला स्वप्न पडते म्हणजेच झोप येते. झोप नसेल तर स्वप्न कसे पडेल? मात्र जाग आल्यानंतर झोपेत पडलेल्या स्वप्नांचा जराही तपशील आठवत नाही, हा भाग अलहिदा. पण काही काही वेळा स्वप्न लक्षात रहातं. जसे ‘रात्रभर मला एक क्षण ही झोप आली नाही’ असे स्वप्न कालंच मला पडलं. ‘रात्र रात्र जागून अभ्यास करतोय’ असंही एक आवडतं स्वप्न शाळेत शिकत असतांना मला दररोज पडत असे. तुमचं स्वप्न भंग होवू नये, असं जर तुम्हाला वाटत असेल एक खबरदारी अवश्य घ्यावी. झोपतांना, घड्याळाचा गजर लावू नये. अशाने मोठी व लांबलचक स्वप्नं बघण्यात अडथळे येत नाही. ‘स्वप्नं नेहमी मोठी असावीत’ असं आपले पूर्व राष्ट्रपती श्री अब्दुल कलाम म्हणून गेले आहेत. आणि ‘मोठी स्वप्नं पहायची असतील तर उशीरापर्यंत झोपून रहावे’ असे मी म्हणून गेलो आहे. तसे पाहिले तर मला स्वतःला घरातले कोणी उशीरापर्यंत झोपलेलं अजिबात बघवत नाही, म्हणूनच मी सर्वात उशीरा झोपून उठतो.
घोरणे हा झोपेचा अजून एक अविभाज्य घटक आहे. कारण न झोपता कोणालाही घोरता येणे अशक्यच. स्वतः झोपणाऱ्याला सोडून इतरांनाच हा घोरण्याचा त्रास असतो. त्यामुळे घोरणाऱ्याच्या शेजारी झोपणे इतरांना शिक्षाच वाटते. गंमत म्हणजे घोरणाराला कधीच खरं वाटत नाही कि तो झोपतांना घोरतो. झोपणारा घोरतोय म्हणजे तो अगदी ‘बिनघोर’ झोपला आहे असे समजावे. मी झोपेत फार घोरतो अशी बायकोची तक्रार आहे, पण ऑफिसात आजपर्यंत याबद्दल मला कधीही कोणी तक्रार केली नाही. मी रात्री मस्त झोपतो आणि तिला सारी रात्र झोप लागत नाही याकरताच हा द्वेषपूर्ण आरोप ती माझ्याविरूद्ध करते...झाले.
फार क्वचितच कोणाला स्वतःच्या घोरण्याचा त्रास होतो. एखादे वेळी तो स्वतःच्याच घोरण्याने दचकुन उठतो. मलाही एकदा असा त्रास सुरू झाला. मी डॉक्टरला माझी समस्या सांगितली कि, ‘खोलीत स्वतःच्याच घोरण्याच्या आवाजामुळे माझी झोप उडते, मग परत मला झोप लागत नाही, यावर उपाय काय?’ तेव्हा आमचे डॉक्टर लगेच उत्तरले- ‘अशा वेळी दुसऱ्या‍ खोलीत झोपायला निघून जात जा.’
घोरण्यासारखा झोपेचा आणखी एक शत्रु म्हणजे सकाळी ठराविक वेळेपुरते येणारे नळ. पाण्याचे नळ येण्याची वेळ नेमकी नगरपालिकेने भल्या पहाटेचीच का ठरवलेली असते, कोणास ठाऊक ? म्हणजे पहाटे नळ येणार या काळजीने रात्रभर जागत रहा आणि नेमके नळ यायच्या वेळेला डुलकी लागायची....आणि तिकडे नळाची वेळ संपली की खडबडून जाग यायची. दुसरा झोपेचा शत्रु म्हणजे रात्रपाळीचा वॉचमन. आपल्याला झोप लागली रे लागली की हा दारापुढून शिट्या वाजवत फेरी मारायला निघणार आणि वरून आम्हालाच ओरडणार-‘जागते रहो‘. अरे जर आम्हालाच 'जागते' रहायचे आहे तर तुला नोकरीवर कशाला कोण ठेवेल. पण ही ललकारी आपल्याला दिलेली असते, कि वॉचमनने स्वतःला जागे राहण्यासाठी, कि चोरांना जागते रहा असा इशारा देण्यासाठी दिलेली असते यावर संशोधन करून एखाद्याला डॉक्टरेटही मिळवता येईल. मला वाटते हे वॉचमन लोकं ‘मी ड्युटीवर आलो आहे’ हे पटवून द्यायला ही आरोळी मारत असणार.
वॉचमन नंतर नंबर लागतो तो पेपरवाला आणि दूधवाला. या दोघांची अगदी शर्यत लागलेली असते कि कोण तुमची झोप आधी उडवतो ते. तुम्ही सकाळच्या साखरझोपेत एखादे मस्त स्वप्न बघत पडलेले असता आणि दारावर धपकन् एक आवाज उमटतो आणि तुमच्या झोपेचे खोबरे होते. तो असतो वर्तमानपत्रवाल्याचा प्रताप. पेपरवाला नसला तर दाराची बेल वाजते आणि दूऽऽऽऽध अशी आरोळी येते. मग तुम्हाला आधी आळस आणि नंतर पांघरूण झटकून उठावेच लागते.
म्हणतात, आळस हा माणसाचा शत्रु आहे. असेही म्हणतात, कि शत्रुलाही मित्र करून घेण्यात माणसाचे खरे कौशल्य आहे. तर मग चला, आजपासून आळसाला आपण मित्र करून घेऊ या. कारण आळस हा झोपेचा पक्का मित्र आहे. आळस आला कि झोपही त्याच्यामागे येणारच. त्यामुळे झोपेबरोबर आपली मैत्री अजून प्रगाढ होण्यास मदत होईल.
इतकं सर्व लिहीतांना मलाही झोप आवरता येत नाहीये आणि वाचतांना तुमची ही छान झोप झाली असणार, अशी आशा करतो.
- निद्रानंद
(विवेक भावसार)

No comments: