Friday, July 5, 2019

आधुनिक मेघदूत (मराठी)




धोकादायक सूचना - खाली लिहिलेल्या कथेतली नावे, स्थळे, शीर्षक अथवा घटना इतर कोणत्याही गोष्टीशी जुळत असतील तर तो निव्वळ योगायोग नाही, फार प्रयत्नपूर्वक तसे केलेले आहे.

आधुनिक मेघदूत 


ही गोष्ट मला माझा मित्र (खालच्या मजल्यावर राहणारा म्हणून ) खालीदास याने खाली (रिकाम्या) वेळेत सांगितलेली आहे. ती मी जशीच्या तशी तुम्हाला सांगायचा प्रयत्न करीत आहे.

आपल्या या कथेचा नायक आहे सेल्स एक्ज्यूकेटिव म्हणून कुबेर फायनांस कंपनीत नोकरी करत असलेला एक तरुण युवक "दक्ष"कुमार. दक्ष कुमार आपल्या कंपनीच्या मालकांचा आवडता कर्मचारी. आणि हा 
दक्षही मोठ्या इमाने इतबारे कंपनीच्या सेवेत झटत असे. अशातच दक्ष कुमारचे लग्न झाले. चांगल्या कंपनीत छानश्या हुद्यावर असल्याने बायकोही त्याला अति सुंदर व प्रेमळ अशी मिळाली. नवे नवे लग्न झालेले होते. नव्या नव्या नवरा-बायकोचे प्रेम नको इतके उतू जात असतेच. त्या परंपरेनुसार दक्षसुद्धा बायकोचे लाड पुरवण्यात गुंग असायचा. रोज रोज हॉटेलात जेवू घालणे, दर आठवड्याला एखाद्या मॉलमध्ये फेरफटका, शॉपिंग व नंतर सिनेमा पाहणे असा त्यांचा प्रेमळ नित्यक्रम चाललेला होता. 

दक्ष आपल्या नव्या बायकोच्या इतक्या प्रेमात पडलेला होता की कंपनीच्या कामाचाही त्याला कधी कधी विसर पडू लागायचा. अशाच एके दिवशी आफिसात एक फार आवश्यक अशी सेल्सच्या स्टाफची मीटिंग होती. आणि त्या मीटिंगला नेमका दक्ष हजर नव्हता शिवाय एक अर्जंट फाईलही त्याने आफिसात आणून दिलेली नव्हती. आफिसतर्फे त्याच्या मोबाईलवर फोन करून विचारणा झाली तेव्हां तो बायको सोबत शॉपिंगसाठी बाजारात असल्याचे कळाले. कंपनीचे मालक श्रीयुत कुबेर ह्यांना ही बातमी समजली. ते फारच नाराज झाले. ताबडतोब त्यांनी दक्ष यास हजर राहण्याचे फर्मान काढले. त्यानुसार दक्ष तातडीने आफिसमध्ये मालकांच्या समोर हजर झाला.

अत्यंत महत्वाची मीटींग सोडून बायकोसोबत शॉपिंग करत फिरत असल्याने कुबेर सर त्याच्यावर भयंकर संतप्त झाले होते. आणि त्यासाठी शिक्षा म्हणून तडकाफडकी त्याची बदली लांबच्या प्रदेशातल्या रामटेकनगर या गावी केली. तेथे त्याला एकटेच जावे लागणार होते. तेथे टारगेट पूर्ण होईस्तोवर त्याच्या बायकोपासून लांब रहावे लागणार होते. मोठ्या दुःखी मनाने तो तेथून घरी परतला. अत्यंत जड अंतःकरणाने ही बातमी त्याने बायकोच्या कानावर घातली. बातमी ऐकून बायकोसुद्धा विरहाच्या विचाराने मोठी कष्टी झाली. 

गावी जायची तयारी करुन झाली. "रोज सकाळ-संध्याकाळ मोबाईल, व्हॉट्स एपवर आपण बोलत जाऊ, तेव्हढीच विरहाची व्यथा कमी होईल ' अशी तिची समजूत घालून दक्षने बायकोचा निरोप घेतला आणि जायला निघाला. रामटेकनगरला पोचल्यावर त्याने पहिले छूट बायकोला पोचल्याचा फोन केला.

धीरे धीरे तो आफिसच्या कामात रुळू लागला. बायकोबरोबर रोज सकाळ -संध्याकाळ फोनवर बोलणेही चालुच होते. नुसते बोलून काय होते ?  बायकोचा विरह त्याच्या मनात सारखा सलत होता. अचानक एक दिवशी बायकोचा मोबाईल लागेना असे त्यास समजून आले. दक्षाने बराच वेळ प्रयत्न करुन पाहिला पण साफल्य काही तयाच्या हाती लागले नाही. दुसरे दिवशीही तोच प्रकार घडला. दक्ष प्रयत्न करून करून थकला पण त्याला काही यश लाभले नाही. कदाचित तिच्या मोबाईलचा बॅलेंस संपलेला असेल किंवा बॅटरी डिस्चार्ज झालेली असणार म्हणून त्याने मनाची बरीच समजूत काढली पण त्या दिवसानंतर कधीच त्याचे बायकोशी बोलणे झाले नाही, इतके मात्र खरे.

बायकोच्या विरहाने आपला दक्ष खुपच झुरत चालला होता. तिच्याशी सकाळ -संध्याकाळ मोबाईलवर होणारे बोलणेही खुंटले होते. दक्षाचे कामात लक्ष लागेना, जेवणात लक्ष लागेना. त्याचे कशातही लक्ष लागेना. त्याचे सहकारीही "दक्ष का नही काम में लक्ष' असं म्हणून चिडवू लागले. दक्ष मनाने आणि शरीराने खंगू लागला. फारच विचित्र अवस्था झाली. त्याचे कपडे त्यास सैल होवू लागले. पँट तर कंबरेत इतकी सैल झाली की आपोआप खाली गळून पडत असे, शेवटी त्याला कंबरेच्या पट्ट्यात एक्स्ट्रा भोकं मारून पट्टा आवळण्याची व्यवस्था करावी लागली.

करता करता पावसाळा जवळ आला. आकाशात काळे काळे ढग धावू लागले. लग्नानंतरचा पहिला पावसाळा. दक्ष बायकोच्या विरहाने अत्यंत व्याकुळ झाला. तिच्याशी नुसते बोलायचे म्हटले तर तो ही मार्ग खुंटला होता. आषाढाचा पहिला दिवस उगवला. बायकोला संदेश कसा पाठवावा याचा विचार करता करता त्याला एक मार्ग सुचला. त्याने कागदावर एक मोठे प्रेमपत्र लिहून काढले. आणि ते पत्र एका पाकिटात घालुन त्यावर आपल्या घरचा म्हणजे "प्रेमसदन", 63, अलकापुरी कॉलनीचा व पाठविणारा (स्वतः)चा पत्ता व मोबाईल नं सकट "VERY ARGENT " लिहून ते पाकिट त्वरित रवाना व्हावे म्हणून ‘गगन' कोरियरला नेऊन दिले. कोरियर कंपनीनेही ते पत्र तातडी पाहून लगेच पहिल्या डाकेने रवाना केले .

पत्र लवकरच दक्षाच्या गृहनगरातल्या कोरियर कंपनीच्या शाखेत येऊन पडले. पत्र दिलेल्या पत्यावर नेऊन देण्याची जवाबदारी "मेघकुमार' या कोरियरबॉय वर आली. मेघकुमार त्या भागातल्या बाकीच्या पत्रांसोबत दक्षाचेही पत्र घेऊन त्याच्या घरी देण्यास निघाला. त्या भागात मेघाचे फारसे येणे जाणे नसल्याने त्याला दक्षाच्या घरचा पत्ता सापडला नाही, म्हणून घरापर्यंत जायचा मार्ग नीट समजून घ्यावा या उद्देशाने त्याने पत्र पाठविणाऱ्याला अर्थात् दक्षाच्या मोबाईलवर फोन लावला. दक्षाने विचारताच त्याने आपला परिचय दिला व घरचा पत्ता शोधण्यास येत असलेली अडचण सांगितली व पत्ता नीट समजावून सांगण्याची विनंती केली.

तेव्हां दक्ष त्यालाम्हणाला - हे मेघ, तुझ्यावर ही फार महत्वाची कामगिरी मी सोपविली आहे. तुझ्या हातात असलेले पत्र हे मी माझ्या प्रिय पत्नीला लिहिले आहे. तू लवकरात लवकर हे पत्र तिच्या हातात पडेल असा प्रयत्न कर. कारण ती माझ्या विरहात दु:खी होवून तळमळत असेल. तिला माझी खुशाली लवकर समजली तर तिला बरे वाटेल. हे मित्रा तू सध्या कुठे उभा आहेस?

तेव्हां मेघकुमारने उत्तर दिले - ''हे दक्षा, मी सध्या प्रत्येक शहरात हटकून असणाऱ्या महात्मा गांधी रोड नामक रस्त्यावरच्या शिवाजी पुतळ्याच्या चौकात उभा आहे. कृपया मला मार्गदर्शन करावे.''

दक्षाने त्याला रस्ता समजाविण्याच्या उद्देशाने पुढील कथन केले - ''मित्र मेघा, तू अगदी योग्य अशा ठिकाणी उभा आहेस, येथून तुला पत्ता शोधण्यास मुळीच श्रम पडणार नाहीत. केवळ माझ्या निर्देशांचे पालन कर.''

दक्ष पुढे म्हणाला,

''हे मेघदूता, तू शिवाजी महाराजांच्या मुखाच्या दिशेने मुख्य रस्त्यावर सरळ चालु लाग. सरळ पुढे चालता चालता तुला डाव्या हाताला तिसऱ्या गल्लीच्या कोपऱ्यावर मिल्क पार्लर नावाची एक टपरी दिसेल. तेथे दूध सोडून इतर सर्व पदार्थ ब्रेड, बिस्किट, अंडी, फरसाण, सिगारेट, चॉकलेट्स, गुटखा, बेक्ड सामोसा इत्यादी हारीने मांडून ठेवलेली दिसतील. पण मित्रा तू त्यांच्याकडे मुळीच लक्ष देऊ नको. तू ती गल्ली सोडून चवथ्या क्रमांकाच्या गल्लीत शिर. त्या गल्लीत शिरल्यानंतर तू तसाच पुढे चालु लाग. बरेच पुढे गेल्यावर तुला तेथे रस्त्यावर नगरपालिकेने पाईप दुरुस्तीसाठी खणलेला एक मोठा खड्डा आढळेल. मला खात्री आहे कि सहा महिन्यांपूर्वी खणलेला तो खड्डा अजून नगर पालिकेने बुजवलेला नसणार. मित्रा तू त्या खड्यात मुळीच उतरु नको, कदाचित त्यात आतापर्यंत बराच चिखलही साचलेला असणार. तू तो खड्डा ओलांडून पुढे जा. "

थोडे थांबुन दक्ष परत म्हणाला,

"पुढे गेल्यावर उजव्या बाजूच्या कोपऱ्यावर एक रिकामा प्लॉट दिसेल. त्यात आजूबाजूच्या लोकांनी टाकलेला कचऱ्याचा साचलेला भलामोठा ढीग दिसेल व त्याची भयानक दुर्गंधीही सुटलेली असेल. तेव्हां तू असं कर मित्रा, ताबडतोब आपल्या खिशातला रुमाल काढून लगेच नाकावर धर आणि तो कचऱ्याचा डोंगर डावलुन उजव्या दिशेला प्रयाण कर. उजव्या दिशेने पन्नास कदम पुढे गेल्यावर एक रुंद रस्ता दिसेल. त्या रस्त्याच्या डाव्या हाताला "अवंतिका' कन्या महाविद्यालयाची महालासदृष्य भव्य इमारत दिसेल. मित्रा जर तू सकाळी दहाच्या सुमारास किवा दुपारी तीन वाजेच्या जवळपास तेथून जात असशील तर अनेक सुंदर, सुकुमार कुमारिकांचा ताफा त्या रस्त्यावरुन लचकत, मुरडत चालत असलेला दिसेल. अर्थात त्या घोळक्यामागे नवतरुणांची एखादी टोळीही मुखाने शीळ घालत किंवा शब्दबाणांनी छेडत त्यांचे अनुसरण करतांना आढळेल. मित्रा, तू दोन घटका रस्त्याच्या कडेला उभा राहून परत परत स्मितपूर्वक मागे वळून पाहून त्या तरुणांना उत्तेजन देणाऱ्या कमनीय तरुणींचे दर्शन कर. जमलं तर एखादी शीळ तूही घाल. थोडा विसावा घे आणि पुढे निघ.

चालता चालता तुझा कंठ शुष्क झाला असणारच. महाविद्यालयाच्या पुढच्या कोपऱ्यावरच एक पाणपोई आहे. तू तेथे थांबून आपली तृष्णा शांत कर. जवळच असलेल्या हिमालय हॉटेलात मिळणारे अमृततुल्य चहापेय घ्यायला तुला नक्कीच आवडेल. चहापानानंतर मित्रा तू ताजातवाना होऊन पुढचा मार्ग आक्रमु लाग. त्याच दिशेने पुढे पुढे वळण न घेता तू चालु लाग. लगेच तुला एक मोठे मैदान आढळून येईल. पूर्ण मैदानभर उकीरड्याच्या ढिगाऱ्यामधून विचरण करणारे वराह अर्थात डुकरांचे कळपच्या कळप तुला दिसून येतील . मैदानातल्या खोल जागेत पाणी किंवा चिखल साचलेला असेल तर त्यात डुंबत आनंदाचा आस्वाद घेणाऱ्या म्हशीं आणि त्यांच्या मागे पुढे फिरणाऱ्या शुभ्र धवल बगळे आणि काळे कुळकुळीत कावळे नामक पक्षीकुलाचे दर्शन घेण्याचे भाग्यही तुला लाभेल.''

दक्ष पुढे सांगत राहिला,

''हे मेघदूता, मैदान मागे टाकून तू किंचित पुढे आल्यास एक मोठा चढ दिसेल. त्या टेकडीवर चढून आल्यावर तुला थंड हवेची एखादी झुळुक येवून आदळेल. तर मित्रा तू मुळीच घाबरुन जाऊ नकोस. कारण अलकापुरी कॉलनीच्या अगदी जवळ तू येऊन ठेपला आहेस. चढ संपताच डाव्या बाजूस कॉलनीचे प्रवेश द्वार आहे व तेथेच अलकापुरीचा नामदर्शक फलक उभारलेला आहे. त्या प्रवेशद्वारातून आत शिरल्यावर रस्त्यात उभ्या असलेल्या गाई, म्हशींना चुकवत मित्रा, तू सहाव्या क्रमांकाच्या गल्लीच्या कोपऱ्यावर जा. तेथे एक नगर पालिकेने ठेवलेली कचरापेटी दृष्टीपथात येईल. सगळा कचरा त्या पेटीच्या आत असण्याऐवजी चारीबाजूला विखुरलेला आढळून येईल. तेथे बसून कचरा विचकणाऱ्या कुत्र्यां, डुकरांपासून अत्यंत हुशारीने आपला बचाव करत तू गल्लीत प्रवेश कर.
गल्लीत पुढे आल्यावर कैलासपति श्रीशंकराचे एक देऊळ तुला दिसेल. तू देवळात जाऊन श्रीशंकराचे दर्शन घे.

भगवान महादेवाचे दर्शन घेऊन बाहेर आल्यावर समोरच 63 क्रमांकाचे प्रेमसदन नावाचे माझे घर आहे. तू तेथे परिसराचे द्वार ओलांडून प्रवेश कर, पण एकदम द्वारघंटिका वाजवू नकोस. कदाचित् माझी प्रिय पत्नी निद्रावस्थेत असेल. कदाचित् ती माझ्या स्वप्नरंजनामध्ये गुंग असेल. द्वारघंटिकेच्या ध्वनिने तिच्या स्वप्नांत व्यवधान पडेल. तू हळूच बाजूच्या गवाक्षातून वाकून पहा. जर माझी प्रिया जागी नसेल तर तिच्यावर तेथुनच बाटलीतले पाणी घेऊन हलक्या हाताने शिडकाव कर. ती निद्रावस्थेतून बाहेर आल्यावर मित्रा तू माझे हे पत्र तिच्या स्वाधीन कर आणि मग वाटल्यास तुझी बाकीची पत्रे वाटायला खुशाल जा.''

पथप्रदर्शनानन्द !
(विवेक भावसार)

No comments: